बाळासाहेब सानप यांना तुकाराम मुंढे यांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:47 AM2018-07-31T01:47:07+5:302018-07-31T01:47:25+5:30
भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पंचवटीत गणेशवाडी येथे विद्याभवन इमारतीचे बांधकाम बेकायदा असल्याच्या न्यायालयीन तक्रारींच्या आधारे सदर मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्ततुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंचवटी : भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पंचवटीत गणेशवाडी येथे विद्याभवन इमारतीचे बांधकाम बेकायदा असल्याच्या न्यायालयीन तक्रारींच्या आधारे सदर मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्ततुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपा आणि आयुक्त मुंढे यांच्यातील संघर्ष यामुळे टोकाला पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंचवटीतील सामाजिक कार्यकर्ता सचिन दफ्तरे यांनी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केली आहे. दफ्तरे यांनी या आधीही या मिळकतीबाबत महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असून, त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वाघाडी नदीकाठी असलेली ही इमारत महापालिकेने भराव टाकून बांधलेली आहे. त्याचप्रमाणे त्याचा बेकायदेशीर वापर होत असल्याची तक्रार असून, त्यावर कारवाईसाठी त्यांनी महापलिकेला पत्र देऊनही कार्यवाही होत नसल्याने आता प्रशासनाने सत्वर कार्यवाही करून अहवाल त्वरित द्यावा म्हणजे न्यायालयात तो सादर करता येईल, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपआयुक्तांना ही मिळकत ताब्यात घेण्यासाठी सांगितले त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कार्यवाही करण्यास सांगितले आहे. विभागीय अधिकाºयांनी सानप यांच्या श्रीराम वाचनालयाला नोटीस बजावली असून, सात दिवसांत खुलासा मागवला होता. त्यानंतर आता कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सध्या भाजपा आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात संघर्ष सुरू आहे.
भाजपाच्या आमदारांनी सुचवलेली कामे करण्याऐवजी आयुक्तांनी हा निधी पाण्याच्या कामासाठी वापरण्याची तयारी केल्याने नाराज काही नाराज आमदार थेट मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. आता त्यात या वादाची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विद्याभवन या इमारतीत गेल्या सतरा ते अठरा वर्षांपासून अभ्यासिका आणि वाचनालय सुरू आहे. त्याचा परिसरातील शेकडो विद्यार्थी लाभ घेत आहेत. त्यातून अनेक विद्यार्थी उपयुक्त शिक्षण घेऊन करिअर घडवित आहेत. सदरच्या मिळकतीसंदर्भात कायदेशीर करारही करण्यात आला आहे. - आमदार बाळासाहेब सानप