“ST कामगारांनी समजून घ्यावे, सरकार सामावून घेऊच शकत नाही”; थोरातांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 01:59 PM2021-12-17T13:59:54+5:302021-12-17T14:01:05+5:30
जर आता त्यांनी ऐकले नाही, तर कारवाईचे निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ST कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप पूर्णपणे तोडगा निघालेला नाही. काही भागातील एसटी सेवा सुरू झाली असली तरी बऱ्याच ठिकाणची एसटीची सेवा ठप्प आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे, यासाठी सरकारकडून अनेकदा आवाहन करण्यात आले आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या विलिनीकरणावर कर्मचारी ठाम आहेत. यातच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना समजुतीने घेण्याचे आवाहन केले आहे. एसटीच्या कामगार बांधवांनी समजून घ्यावे. सरकार सामावून घेऊच शकत नाही, असे म्हटले आहे.
एसटीच्या संपकरी कामगार बांधवांनी समजून घेतले पाहिजे. किती ताणायचे हे ठरवावे. भाजपचे सरकार असतानाही एसटी विलिनीकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेले नव्हता. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारच्यावतीन जेवढे चांगले आहे, तेवढे दिले आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. नाशिक येथे ते बोलत होते.
अन्यथा कारवाईचे निर्णय घ्यावे लागतील
एसटीच्या संपकरी कामगारांनी आता थांबावे. संप संपुष्टात आणून कामावर रुजू व्हावे. जर आता त्यांनी ऐकले नाही, तर कारवाईचे निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. तत्पूर्वी, आम्ही जनतेलाही बांधील आहोत. आता सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. मेस्मा लावण्याबाबत बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. वेगवेगळ्या पर्यायांवर विचार सुरू असून आमचे दायित्व जसे कर्मचाऱ्यांशी तसे ते जनतेशीदेखील आहे, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. आतापर्यंत सुमारे हजारो कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. सदावर्ते यांचे काही नुकसान होत नाही, अशी टीका अनिल परब यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसून, कॅबिनेटमध्ये निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निर्णय होणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.