नाशिक येथील के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 08:53 AM2022-02-07T08:53:16+5:302022-02-07T08:53:53+5:30
Balasaheb Wagh : शिक्षण आणि सहकार चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते आणि नाशिक मधील के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ यांचे आज रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले.
नाशिक- शिक्षण आणि सहकार चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते आणि नाशिक मधील के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ यांचे आज रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले. उद्या म्हणजेच सोमवारी दुपारी 3 वाजता त्यांच्यावर पंचवटी अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव दुपारी 12 वाजता वाघ महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पद्मश्री आणि कर्मवीर काकासाहेब तथा देवराम वाघ यांचे सुपुत्र असलेल्या बाळासाहेब वाघ यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1932 रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढी गावात झाला.
वडिलांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात वारसा पुढे नेणाऱ्या बाळासाहेब वाघ यांनी 1970 मध्ये के के वाघ शिक्षण संस्थेची स्थापना केली. 2006 पर्यंत उपाध्यक्ष तर 2006 नंतर अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्था सांभाळली. नाशिक जिल्ह्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे 22 वर्षे अध्यक्षपद सांभाळली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असो डेक्कन शिखर संस्था अशा अनेक संस्थांवर त्यांनी पदे भूषवली. निफाड तालुक्यात 250 कर्मवीर बंधारे बांधून सिंचनाची सोय केली. राज्य शासनाच्या दुसऱ्या जलसिंचन आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम बघितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने त्यांना 2009 जीवन गौरव पुरस्कार दिला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.