वरातीत नाचण्यासाठी बाेलावले; जिवे मारून धरणात फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 01:21 AM2022-05-26T01:21:38+5:302022-05-26T01:22:08+5:30
अनैतिक संबंधाच्या कारणावरून कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने तालुक्यातील नांदूर येथील तरुणास वरातीत नाचण्याच्या बहाण्याने बोलावले. त्याला मद्य पाजत गळा आवळून खून केल्यानंतर त्याचे हात-पाय बांधून नाग्या-साक्या धरणात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना याप्रकरणी ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : अनैतिक संबंधाच्या कारणावरून कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने तालुक्यातील नांदूर येथील तरुणास वरातीत नाचण्याच्या बहाण्याने बोलावले. त्याला मद्य पाजत गळा आवळून खून केल्यानंतर त्याचे हात-पाय बांधून नाग्या-साक्या धरणात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना याप्रकरणी ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील नांदूर येथील अमोल धोंडीराम व्हडगर (२२) या तरुणाचा हात-पाय बांधलेल्या स्थितीत मृतदेह नाग्या-साक्या धरणातील पाण्यात तरंगताना मंगळवारी (दि.२४) आढळून आला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. २४) रात्री उशिरा अनोळखी मारेकऱ्यांविरोधात नांदगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गावातील केसकर यांच्याकडे वरातीत नाचण्यासाठी जाऊन येतो, असे सांगून अमोल घरातून गेला. तो रात्री उशिरापर्यंत परत आलाच नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याची चौकशी सुरू केली. तरीही त्याचा ठावठिकाणा लागेना म्हणून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि खुनाचा १८ तासांत उलगडा झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोलचे संशयित गोविंदा वाळुबा केसकर, चैतन्य (सोनू) साहेबराव केसकर यांच्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध होते. अमोल यास याबाबत वेळोवेळी समजावूनदेखील तो जुमानत नसल्याने रविवारी (दि. २२) लग्नाच्या वरातीत संशयितांनी अमोल यास बोलावून घेतले व त्याला मद्य पाजत नांदूर येथून नाग्या-साक्या धरणाच्या बाजूला घेऊन गेले. तेथे त्याचा दोरीने गळा आवळून जिवे ठार मारले व नंतर त्याच दोरीने मयताचे हात-पाय बांधून धरणात टाकून देत तेथून पसार झाले. पोलिसांपुढे या खुनाप्रकरणी तपासाचे मोठे आव्हान उभे होते. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवीत अखेर दोन्ही संशयितांना जेरबंद केले. पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरडकर व ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.