बळीराजा रस्त्यावर
By admin | Published: June 2, 2017 12:41 AM2017-06-02T00:41:11+5:302017-06-02T00:41:30+5:30
नाशिक : कर्जमाफी तसेच स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला गुरुवारी निफाड, येवला, सटाणा व दिंडोरी या तालुक्यांमध्ये हिंसक वळण लागले
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कर्जमाफी तसेच स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला गुरुवारी निफाड, येवला, सटाणा व दिंडोरी या तालुक्यांमध्ये हिंसक वळण लागले. मुंबईकडे तसेच बाजार समित्यांमध्ये जाणारा शेतमाल, दूध तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर ओतण्यात आला, तर काही ठिकाणी तो पेटविण्यातही आला. संपाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको तसेच चक्का जाम आंदोलनेही केली. येवल्यात संतप्त शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक शेतकरी जखमी झाल्याचीही घटना घडली.येवल्यात शेतकरी संपाने हिंसक वळण घेतल्याने दूध, भाजीपाल्यासह अनेक जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या मालाची वाहने ठिकठिकाणी अडवून माल रस्त्यावर फेकण्यात आला. अनेक ठिकाणी दूध ओतून सरकारच्या शेतकरीविरोधी नीतीचा निषेध करण्यात आला.
बागलाण तालुक्यात सटाणा शहर, करंजाड येथे रास्ता रोको करून शेतमाल रस्त्यावर फेकल्याने एकच गोंधळ उडाला तर मालट्रकमधून गव्हाचे कट्टे फेकल्याने संपाला हिंसक वळण लागले. सकाळी १० वाजता लखमापूर, ब्राह्मणगाव, मुळाणे, शेमळी, अजमीर सौंदाणे येथील शेकडो शेतकऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढून सटाणा येथे तहसील कार्यालयावर धडक दिली.
निफाड तालुक्यात नैताळे येथे रस्त्यावर शेतमाल फेकून निषेध केला. लासलगाव, पिंपळगाव
कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने शेतमालाचे व्यवहार ठप्प झाले होते.
नाशिक - औरंगाबाद रस्त्यावर बोकडदरे येथे ट्रक अडवून त्यातील कांद्याच्या गोण्या रस्त्यावर फेकून संताप व्यक्त करण्यात आला. वनसगावला संतप्त शेतकऱ्यांनी टायरची जाळपोळ केली. निफाड येथील सर्व दूध संकलन केंद्र पहिल्या दिवशी बंद ठेवण्यात आली होती. तसेच लासलगाव, पिंपळगाव बाजार समित्या बंद असल्याने व्यवहार ठप्प झाले होते.
तेलाचा टॅँकरही खाली
येवला येथे शेतकऱ्यांनी कांदे, बटाटे, लसूण यासह सर्वच शेतमाल दिसेल त्या वाहनातून रस्त्यावर फेकला. तेलाचा टँकरदेखील रस्त्यावर खाली करण्यात आला. तेलाचे व तुपाचे डबे, गव्हाचे पोते यासह दिसेल तो शेतमाल रस्त्यावर आणून टाकला गेला. दुधाच्या पिशव्या असलेल्या गाड्या अडवून सुमारे पाचशे ते सातशे लिटर दुधाच्या पिशव्या फत्तेबुरु ज नाका चौफुली व बाजार समितीसमोर रस्त्यावर ओतण्यात आल्या.गव्हाचे कट्टे फेकले
सटाणा शहर, करंजाड येथे रास्ता रोको करून शेतमाल रस्त्यावर फेकल्याने एकच गोंधळ उडाला. गव्हाने भरलेल्या मालट्रकमधून कट्टे फेकल्याने संपाला हिंसक वळण मिळाले. पोलीस यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मालट्रकमधून आंदोलनकर्त्यांनी फेकले. गव्हाचे कट्टे व शेतमाल रस्त्यावर फेकला. साक्री-शिर्डी रस्त्यावर वाहने अडवून चक्का जाम केला.
दूध वाहतूक रोखली
निफाड तालुक्यात टेम्पो, ट्रकमधील शेतमाल रस्त्यावर फेकणे, रास्ता रोको, दूध, भाजीपाला विक्र ी बंद आदी मार्गाने हे आंदोलन यशस्वी झाले. या तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने शेतमालाचे व्यवहार ठप्प झाले होते, तर या तालुक्यात दूध संकलन केंद्र बंद असल्याने या तालुक्यातून इतर शहरात जाऊ शकले नाही.