बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:58+5:302021-06-16T04:18:58+5:30
हवामान खात्याने यावर्षी राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार असल्याचे वर्तविले आहे. त्यात शेतकरी मशागतीची कामे उरकून बाजरी, सोयाबीन आदींसह ...
हवामान खात्याने यावर्षी राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार असल्याचे वर्तविले आहे. त्यात शेतकरी मशागतीची कामे उरकून बाजरी, सोयाबीन आदींसह अन्य पिकांच्या पेरणीसाठी सज्ज झाले होते. नांदूरशिंगोटे व परिसरातील विविध गावांतील कृषी सेवा केंद्राच्या दुकानांत बी-बियाणे सजले होते; पण मृग नक्षत्र सुरू होऊन जेमतेम सात दिवस झाले आहेत. सुरुवातीला एक दिवस पाऊस झाला. तोच पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या पाच दिवसांपासून परिसरात उन्हाचा चटका वाढला असून, वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू असल्याने शेतकऱ्यांना पावसाची वाट पहावी लागत आहे. मृग नक्षत्रात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गतवर्षी शेतकरी बेमोसमी पाऊस, अवकाळी पाऊस, चक्रीवादळे झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. या सर्व संकटांवर मात करीत खरीप पिकांच्या पेरणीसाठी बी-बियाणे, खतांसाठी पैशांची तजवीज करून खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
इन्फो
मान्सूनपूर्व पावसाने परिसरातील काही गावांंमध्ये हजेरी लावली होती. तर काही भागात तुरळक पाऊस झाला होता. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी थोड्याफार ओलीवर पेरणी केली होती. पंरतु मृग नक्षत्र सुरू होऊन सात दिवसांचा कालावधी होत आला आहे. मात्र, चांगल्या प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. प्रामुख्याने मृग नक्षत्रातच बळीराजा खरीप हंगामातील पिकांची पेरणी करीत असतो. त्यामुळे बळीराजा सध्या तरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.