संकटांचा सामना करत श्रमाने मोती पिकवण्याची बळीराजाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 02:58 PM2020-06-27T14:58:26+5:302020-06-27T14:58:51+5:30
येवला : तालुक्यातील पेरणी झालेल्या पिकाची उगवण व पिक परिस्थिती सध्यातरी समाधानकारक आहे. मात्र, यंदाही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा तर कापूस पिकावर सेंद्रीय बोंड अळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. नेहमीपेक्षा यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
योगेंद्र वाघ । लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील पेरणी झालेल्या पिकाची उगवण व पिक परिस्थिती सध्यातरी समाधानकारक आहे. मात्र, यंदाही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा तर कापूस पिकावर सेंद्रीय बोंड अळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. नेहमीपेक्षा यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विषम पाणी पुरवठ्याने तीन भागात विभागलेला दुष्काळी तालुका म्हणून येवल्याची ओळख आजही कायम आहे. कालवा लाभक्षेत्रातील शेती वगळता तालुक्यातील शेती आजही, नैसर्गिक जलस्त्रोतांवरच अवलंबून आहे. पाऊस पडला तर शेती पिकली हे या भागातील समीकरण गेल्या पन्नासवर्षातही बदलू शकले नाही. नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने तालुक्यात पारंपारीक पिकांकडून मका, कपाशी, सोयाबीन पिकांकडे शेतकरी वळले आहे. मात्र, अस्मानी, सुल्तानी संकटांनी तालुक्यातील शेतकर्?यांची पाठ सोडलेली नाही.
गेल्या दोन वर्षात तालुक्यात पर्जन्यमान चांगले राहिले परिणामी उत्पादन वाढले परंतू शेतमालाचे भाव नेहमीप्रमाणेच पडल्याने तोंड मिळवणी करतांना शेतकऱ्यांना कसरतच करावी लागली. यंदाही, कोरोनाचा फटका बसल्याने शेतमालाचे भाव पडले अन् शेतकरी अिर्थक संकटात सापडला आहे. द्राक्ष, डाळींब,कांदा व भाजीपाला उत्पादकांना याचा मोठा फटका बसला. नगदी पिक हाच तालुक्याचा आजचा पिक पॅटर्न बनला असून यंदा उत्तर-पूर्व भागात चांगला पाऊस झाल्याने नद्या, बंधारे भरले तर विहिरींना पाणी उतरले आहे. या तुलनेत कालवा लाभक्षेत्रात दक्षिण-पश्चिम भागात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे. पेरण्यानंतर पावसाने ओढ दिल्याने केलेला खर्च वाया जातो की काय, या धास्तीने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, बहुत्वांशी पिकांनी जमीनीच्यावर डोके काढल्याने बळीराजाच्या जीवात जीव आला आहे.
चाचणीसाठी सोडण्यात आलेले मांजरपाड्याचे पाणी बाळापूर पर्यंत पोहचल्याने उत्तर-पूर्व भागातील वंचितांच्या आशा पालावल्या आहेत. तालुक्यातील वंचित भागातील अनेक शेतकºयांनी शेततळी करून नैसर्गिक व उपलब्ध पाण्याचा साठा करत शेती फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. बोटावर मोजण्या इतक्या शेतकºयांनी शेतीतील नवे प्रयोग व नवे पिके घेण्याचा प्रयत्नही केला आहे. डोंगरपट्यातील शेतीसाठी स्वतंत्र विचार होणे ही काळाची गरज आजही कायम आहे.
(फोटो २७ येवला,१)