बळीराजाचा जोडधंदाही धोक्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:18 PM2020-11-04T19:18:01+5:302020-11-04T19:19:00+5:30
सायखेडा : कॅलिफोर्निया तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुव्यवसायाकडे पाहिले जाते. परंतु आता पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने व दुधाचा भाव पशुपालकांना परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे पाळीव जनावरे विकत घेण्याकडे कल कमी होत आहे.
सायखेडा : कॅलिफोर्निया तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुव्यवसायाकडे पाहिले जाते. परंतु आता पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने व दुधाचा भाव पशुपालकांना परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे पाळीव जनावरे विकत घेण्याकडे कल कमी होत आहे.
शासनाकडून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. अशातच जनावरांच्या खाद्यात वाढ झाल्याने पशुपालक अडचणीत सापडले आहेत. खाद्याची किमत व दुधाच्या शासकीय दरातील तफावत लक्षात घेता जनावरे कशी पाळावी, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहिला आहे. अशातच या खाद्याच्या भावात गेल्या अनेक वर्षांनंतर मोठी दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे पशुपालक चांगलेच संकटात सापडले आहेत.
आज सद्यस्थितीत सरकी ३० रुपये किलो, ढेप ३८ रुपये किलो, सुग्रास २३ रुपये किलो, गोळीपेंड २२ रुपये किलो, तर शेंगपेंड ४५ ते ५० रुपये किलो झाली आहे. त्याप्रमाणात शासकीय दुधाचा भाव २२ रुपये लिटर आहे. खाद्य व दुधाचे दर यांच्यातील तुलना केल्यास जनावरे न पाळलेली बरी, असे शेतकरी म्हणू लागले आहे. वर्तमानकाळात दुभती जनावरे पाळण्याच्या संख्येत बरीच घट झाली आहे.
एकीकडे संपूर्ण निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात गवत, गंजी आणि कडब्याची नेहमीच कमतरता असते, तर दुसरीकडे दिवसेंदिवस खाद्याच्या वाढत्या दरामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
चौकट...
शासनाकडून शेतीपूरक व्यवसायाला दुग्ध व्यवसायाची जोड द्यावी असे सल्ले वारंवार दिले जात असून, अनुदानावर जनावरे दिली जात आहेत. अशातच आता जनावरांच्या खाद्यात विक्रमी वाढ केल्याने पशुपालकांनी अनुदानावर देण्यात येणारे ते जनावरे घेण्याकडे पाठ फिरविली आहे. शासनाने दुधाच्या शासकीय दरात वाढ करावी किंवा जनावरांच्या खाद्यांचे दर कमी करावे, अन्यथा येत्या काळात जनावरे पाळणाऱ्यांचे प्रमाण आणखी कमी होण्याची भीती नाकारता येत नाही.
- गणेश मोगल, संचालक, दूध डेअरी, भेंडाळी