मांगोणे येथील बंधारा फुटण्यापासून वाचला
By admin | Published: August 6, 2016 12:33 AM2016-08-06T00:33:11+5:302016-08-06T00:33:53+5:30
अनर्थ टळला : गटविकास अधिकाऱ्यांची सतर्कता
पेठ : दोन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने मांगोणे येथील पाझर तलाव १०० टक्के भरला खरा; मात्र या बंधाऱ्याचा सांडवा बंद झाल्याने बंधाऱ्यात क्षमतेपेक्षा अधिक पाणी साठवण झाल्याने बंधारा फुटतो की काय अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. सरपंच उषा गवळी यांनी ही बाब पंचायत समितीला कळविली.
गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम यांनी तात्काळ लघू पाटबंधारे विभागाचे अभियंता लिलके यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बंधाऱ्यात येणाऱ्या पूर पाण्याचा जोर वाढत असल्याने कोणत्याही क्षणी वरून पाणी जाऊन बंधारा फुटू शकतो अशी स्थिती निर्माण झाली असताना बहिरम यांनी मांगोणे गावातील मजूरांच्या साह्याने संततधार पावसात सांडवा मोकळा केला त्यामूळे पाण्याची पातळी कमी झाली. या बंधाऱ्याच्या खाली शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर भातशेती केली असून दुर्देवाने बंधारा फुटला असता तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. प्रशासकिय आधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सतर्कतेमुळे हा बंधारा वाचला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने धोका टळला आहे. (वार्ताहर )