बेमोसमी पावसाने नाशिकमध्ये गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:23 PM2017-11-20T12:23:37+5:302017-11-20T12:23:42+5:30
नाशिक- कडक हिवाळा सुरु असताना राज्यभर ठिकठिकाणी झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही सोमवारी(दि.२०) सकाळी सुमारे दोन तास पावसाचा शिडकावा झाला. अनपेक्षीतपणे आलेल्या पावसामुळे छत्री, रेनकोटअभावी कंपनी, कार्यालयांमध्ये निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. पावसाला जोर नसला सातत्याने दोन तास सुरु असलेल्या रिमझिम सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. सकाळ होऊनही सुर्यदेवतेचे दर्शन न झाल्याने जवळपास कुठेतरी पाऊस झाल्याचे संकेत मिळत होते. सकाळी ११ च्या दरम्यान शहरात सिडको, सातपूर, नाशिकरोड, मेनरोड, कॉलेजरोड, गंगापूर रोड, पंचवटी आदि जवळपास सर्वच भागात पावसाला सुरवात झाली. चाकरमान्यांबरोबरच शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले तर रस्त्यावर बसून भाज्या, फळे, गृहपयोगी वस्तू आदि विकणाºया छोट्या विक्रेत्यांचीही गैरसोय झाली. बाजारपेठांमधील अनेक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवत गारव्याचे घरीच बसून रहाणे पसंत केल्याचे दिसत होते. गारव्यामुळे चहाच्या टपºयांवर ग्राहकांची गर्दी झालेली पहायला मिळाली, तर काहींनी गरमागरम भजे, वडे, सुप आदिंचा आस्वाद घेण्यास पसंती दिली. पावसामुळे अनेक पालकांनी मुलांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय घेतला. बेमोसमी पावसामुळे नाशिककरांची दाणादाण उडालेली पहायला मिळाली.