नाशिक विभागातील अभयारण्यांमध्ये प्रवेश बंदी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 07:20 PM2020-04-30T19:20:20+5:302020-04-30T19:21:46+5:30
सर्व भागात वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व्यक्तिश: गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह पर्यटन बंदीकरीता विशेष पथक नेमण्यात यावे.
नाशिक : राज्यात सातत्याने कोरोनाच्या रु ग्णांत वाढ होत असल्याने दक्षता म्हणून राखीव वनक्षेत्र व अभयारण्यांचे दरवाजे पर्यटक व अभ्यासकांसाठी मार्चच्या पंधरवड्यापासून बंद करण्यात आले आहेत. नाशिकचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनीही नाशिक विभागातील सर्व अभयारण्ये, वनक्षेत्रांच्या परिसरात प्रवेशास मज्जाव कायम ठेवल आहे. ३०एप्रिल रोजी मागील आदेश संपल्यानंतर पुन्हा १ मेपासून पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी कायम ठेवण्यात येणार असल्याचे पत्रक जारी केले आहे.
वन्यजीव विभागाने करोनामुळे निफाड तालुक्यातील प्रसिध्द नांदूरमध्यमेश्वर, धुळे जिल्ह्यातील अनेर डॅम, जळगावमधील यावल आणि अहमदनगर मधील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात जाता येणार नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. या भागात सातत्याने वनविभाग प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे पथक गस्तीवर आहेत.
वन्यजीव विभागाने नाशिक परिक्षेत्रातील संपूर्ण वनक्षेत्रात पर्यटकांसह अभ्यासकांना जाण्यास मज्जाव केला आहे. शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही ठिकाणी गर्दी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे अभयारण्ये, वनक्षेत्रात पर्यटनास बंदी घातली असून, या सर्व भागात वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व्यक्तिश: गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह पर्यटन बंदीकरीता विशेष पथक नेमण्यात यावे. तसेच पर्यटकांना वनक्षेत्रात न जाण्याचे आवाहन करत अभयारण्यांच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये जनजागृती करत गोरगरीब शेतमजूर, आदिवासी वर्गाला जीवनावश्यक वस्तूंची मदतदेखील करण्याचे आवाहन अंजनकर यांनी केले आहे.