संध्याकाळच्या दूधविक्रीवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:52+5:302021-04-25T04:14:52+5:30
------- नाशिक : वैद्यकीय आपत्कालीन सेवा देणाऱ्या अस्थापनांव्यतिरिक्त भाजीपाल्यासह दूधविक्रीदेखील संध्याकाळच्या सुमारास पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून शनिवारी ...
-------
नाशिक : वैद्यकीय आपत्कालीन सेवा देणाऱ्या अस्थापनांव्यतिरिक्त भाजीपाल्यासह दूधविक्रीदेखील संध्याकाळच्या सुमारास पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून शनिवारी (दि.२४) देण्यात आले.
राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला, किराणा, दूध विक्री, बेकरी उत्पादने, फळे आदी वस्तूंच्या किरकोळ काउंटर विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दूध विक्रेत्यांकडून संध्याकाळीसुद्धा काही तास दूध विक्रीला सवलत द्यावी अशी मागणी होत होती. यानुसार पोलिसांनी चर्चा करत संध्याकाळी दूधविक्रीच्या दुकानांपुढे ग्राहकांची मोठी गर्दी जमते आणि तेथे ‘'सोशल डिस्टन्स’ पाळला जात नसल्याचे समोर आले. यामुळे प्रत्यक्षात सकाळची दूधविक्री सुरू ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. दूधविक्री अत्यावश्यक सेवेत येते. अनेक ठिकाणी दूधविक्रीच्या नावाखाली मिठाई आणि तत्सम बेकरी उत्पादन वस्तूंची विक्री होते, असे पोलिसांच्या लक्षात आले. हे प्रकार टाळण्यासाठी दुधाची घरपोच सेवा सुरू करावी, असा पोलिसांचा प्रयत्न होता. तूर्तास रस्त्यावर अथवा दुकानांमध्ये सायंकाळच्या सुमारास होणारी दूधविक्री पोलिसांनी पूर्णपणे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील काही भागात हा नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. यामुळे दूध विक्रेत्यांची शनिवारी संध्याकाळी तारांबळ उडाली. सायंकाळची दूधविक्री बंद झाल्याने सकाळच्या दुधाच्या मागणीत अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यातून दूध व्यावसायिक कसा मार्ग काढतात याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे. संध्याकाळी दूधविक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे सकाळी दूध खरेदीसाठी झुंबड उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे दूधविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना याबाबत अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.