मालेगावच्या साबण कारखान्यांवर आणणार बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 09:57 PM2021-11-24T21:57:47+5:302021-11-24T21:57:47+5:30
मालेगाव : चणकापूर धरणातील पाण्यावर मालेगावकरांचा १९७२ पासून हक्क आहे. तेथे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर शेतीसाठी पाण्याचा उपयोग केला जातो; मात्र सध्या शहरात पाण्यावरून राजकारण केले जात आहे. चणकापूर व गिरणा धरणाचे पाणी शुद्ध आहे. येथील साबण कारखान्यांचे दूषित पाणी गिरणा नदीत सोडले जाते. यामुळे पाणी दूषित होते. त्यासाठी साबण कारखाने बंद करण्याचा विषय महापालिकेच्या येत्या महासभेत मांडला जाणार असल्याची माहिती माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रशीद शेख यांनी सांगितले, शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जुना आग्रा रस्त्याचे ९ कोटी रुपये खर्चून कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. उर्वरित अन्सार पत्रा डेपो ते देवीचा मळापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी येत्या शुक्रवारी (दि.२६) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत १० कोटींच्या निविदा प्रक्रिया तसेच कुसुंबा रोड कॉंक्रिटीकरणाच्या ७ कोटी रुपयांच्या निविदा असे एकूण १७ कोटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. शहीद अब्दुल हमीद रोड (कुसुंबा रोड) हा अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे खराब झाला आहे. त्यावर राजकारण केले जात आहे. दोन्ही रस्त्यांची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण केले जातील, असेही माजी आमदार शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गुन्हे मागे घेण्याची मागणी
त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला बंद शहराच्या पूर्व भागात शंभर टक्के यशस्वी झाला होता; मात्र काही लोकांकडून व राजकारण्यांकडून शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला गेला. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा प्रकार घडला आहे. २००१ साली झालेल्या दंगलीची पुनरावृत्ती करण्याचा काही लोकांचा डाव होता; मात्र तो यशस्वी झाला नाही. शांतता बिघडविणारे मूठभर लोक आहे. त्यांनी शहरातून पलायन केले आहे. या घटनेत सर्वसामान्य घरचे तरुण अडकले आहेत. निरपराध लोकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, असेही शेख यांनी सांगितले.