सिन्नरमधील आठवडे बाजारांवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:38+5:302021-03-10T04:15:38+5:30
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्ह्यात निर्बंध असणारी नियमावली तयार करण्यात आली असून नगर परिषदेने नियमांचे काटेकोर पालन ...
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्ह्यात निर्बंध असणारी नियमावली तयार करण्यात आली असून नगर परिषदेने नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रयत्न आणि जनजागृती करण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या कालावधीत चालू राहतील. यामध्ये आवश्यक दुकाने यांना वगळण्यात येऊन ती २४ तास चालू राहू शकतात. प्रत्येक शनिवार व रविवार अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. त्याचबरोबर शनिवार आणि रविवारचा सिन्नरचा आठवडे बाजार बंद राहील असे पत्रक नगर परिषदेने प्रसिध्द केले आहे.
लग्न समारंभाच्याबाबतीत पूर्वनियोजित व १५ मार्चपर्यंत नगरपालिकेची आणि पोलीस प्रशासनाची प्रतिज्ञा पत्र देऊन परवानगी घेऊन १५ मार्चपर्यंत करता येतील. त्यानंतर लग्न समारंभाला बंदी असेल. खाद्यगृह आहे. परिमट रूम बार सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत फक्त पन्नास टक्के टेबल घेऊन सुरू राहतील. होम डिलिव्हरीचे किचन व वितरण कक्ष रात्री १० पर्यंत चालू राहतील. जिम व्यायाम शाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदाने स्विमिंग टँक फक्त वैयक्तिक सरावासाठी सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामूहिक स्पर्धा कार्यक्रम याठिकाणी बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम उत्सव समारंभ पूर्णपणे बंद राहणार आहेत. धार्मिक स्थळे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ सुरू राहतील मात्र या ठिकाणी पूजाअर्चा होमहवन करण्याकरता फक्त पाच जणांना परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. त्यामध्ये दोन भाजीवाले यांच्यामध्ये एक मीटर अंतर ठेवणे बंधनकारक आहे. त्यासोबतच सर्वांना मास्क, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे, असेही केदार यांनी सांगितले.
इन्फो
खास पथकांची नियुक्ती
बुधवारपासून शहरातील दुकाने सायंकाळी ७ वाजेनंतर बंद होतात की नाही किंंवा आस्थापनेत मास्क व सामाजिक अंतर पाळले जाते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी व कारवाई करण्यासाठी खास पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. मंगल कार्यालये, हॉटेल, भाजी मंडई याठिकाणी सदर पथके नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
कोट....
‘कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावली लागू केली आहे. बुधवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. गर्दी होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. तालुक्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद राहणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन सहकार्य करावे.
- राहुल कोताडे, तहसीलदार, सिन्नर