लग्नतिथीने वाहतुकीचा वाजला ‘बँड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 01:32 AM2022-04-25T01:32:05+5:302022-04-25T01:32:14+5:30
रविवारी दाट लग्नतिथी असल्यामुळे औरंगाबाद ते नांदूर नाक्यादरम्यान असलेल्या मंगल कार्यालयांमध्ये लग्नसोहळे असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि अवघ्या तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना दीड ते दोन तासांचा अवधी लागला. वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांच्या हॉर्नचा गोंगाट आणि ठिकठिकाणी लग्नसोहळ्यातील डीजेमुळे या मार्गाचा अक्षरश: बँड वाजला होता.
नाशिकरोड : रविवारी दाट लग्नतिथी असल्यामुळे औरंगाबाद ते नांदूर नाक्यादरम्यान असलेल्या मंगल कार्यालयांमध्ये लग्नसोहळे असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि अवघ्या तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना दीड ते दोन तासांचा अवधी लागला. वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांच्या हॉर्नचा गोंगाट आणि ठिकठिकाणी लग्नसोहळ्यातील डीजेमुळे या मार्गाचा अक्षरश: बँड वाजला होता.
औरंगाबाद ते नांदूर नाक्यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला लॉन्स, हॉल, मंगल कार्यालये असल्याने लग्नतिथीला या मार्गावर अनेक सोहळे असतात. रविवारी (दि. २४) दिवसभर या मार्गावर अनेक लग्नविधी असल्यामुळे दिवसभर या मार्गावर वाहनांची वर्दळ होती. मात्र, सायंकाळी असलेल्या लग्नकार्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने या मार्गातून दुचाकी, चारचाकी गाडी काढणेही कठीण झाले आणि औरंगाबाद ते नांदूर नाका हे अवघ्या तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना दीड ते दोन तासांचा अवधी लागला. लग्न सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडींची वाहने रस्त्यातच उभी असल्यामुळे मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांची अडचण झाली आणि वाहतूक कोंडीत वाहने अडकून पडली.
शेजारी-शेजारी असलेले लॉन्स, मंगल कार्यालयांमध्ये एकाच वेळी विधी असल्यामुळे आलेल्या वऱ्हाडींची गर्दी वाढत गेली. लॉन्सव्यतिरिक्त वऱ्हाडींनी रस्त्यावरही वाहने उभी केली होती. अशातच लग्नाच्या वराती आणि रस्त्यावरील वाहनांची वर्दळ यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत गेली. सुमारे अडीच ते तीन तास वाहतूक कोंडी कायम होती.
--इन्फो--
आमदार ढिकले उतरले रस्त्यावर
येथील एका लग्न सोहळ्यासाठी आलेले आमदार ढिकले यांनी वाहतूक कोंडीची परिस्थिती पाहून स्वत: वाहतूक नियंत्रणासाठी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मदतीला मग कार्यकर्तेही धावून आले. या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस नसल्याने ढिकले यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांशी संपर्क करून कोंडीची माहिती दिली.
--इन्पो--
पोलीसही अडकले वाहतूक कोंडीत
आमदार ढिकले यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर औरंगाबाद नाक्यापर्यंत पोलीस पोहोचले. मात्र, तेही वाहतूक कोंडीत अडकून पडले. त्यांचे वाहन पुढे येत नसल्याने अखेर गाडीतून उतरून पोलिसांनी कोंडीतून मार्ग काढत वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न केला.