लासलगाव-येवला मतदारसंघात सोमवारी बंदची हाक; मराठा समाजावरील हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2023 12:32 PM2023-09-02T12:32:00+5:302023-09-02T12:34:10+5:30
मंत्र्यांना घेराव घाला.
शेखर देसाई, लासलगाव : जालना येथील मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध लासलगाव येथे समाजबांधवांच्या बैठकीत करण्यात आला. यंदा दुष्काळजन्य परिस्थिती असतांना लक्ष विचलित करण्याच्या हेतूने हा हल्ला करण्यात आला आहे. केवळ निषेध व्यक्त करून चालणार नाही तर निर्णय घेण्याची वेळ आहे. भुजबळांच्याच मतदारसंघात मंत्र्यांना घेराव घालण्याचे आवाहन यावेळी ठाकरे शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी केले.
या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येत्या सोमवारी (दि.४) येवला-लासलगाव मतदार संघातील ४६ गावांमध्ये बंद पाळण्याचे ठरवण्यात आले. शनिवारी जालना येथील निंदनीय घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली असून सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून एकत्र येत या घटनेचा निषेध केला पाहिजे अशी मागणी सरपंच जयदत्त होळकर यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणाचा उगम हा येवला-लासलगाव मतदारसंघात असून १६८ आमदार मराठा समाजाचे आमदार असून देखील आरक्षण मिळत नाही हे त्यांचे अपयश आहे. आता आमदारांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे शिवा सुरासे यांनी म्हटले तर येवला -लासलगाव मतदार संघांचे आमदार छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या मागे उभे राहणार नसेल तर त्यांनी दुसऱ्या मतदार संघाचा विचार करावा ,असा थेट इशारा रामनाथ शेजवळ यांनी दिला.
यावेळी गुणवंत होळकर, उत्तम कदम, प्रकाश पाटील, सचिन होळकर, डॉ. श्रीकांत आवारे, प्रवीण कदम, ललित दरेकर, रवी होळकर, रमेश पालवे, डॉ विकास चांदर, डॉ. सुजित गुंजाळ, डॉ. विलास कांगणे, संतोष पानगव्हाणे, अफजल शेख, विशाल पालवे, मंगेश गवळी, डॉ. अमोल शेजवळ, राम बोराडे, राजाबाबा होळकर, योगेश पाटील, केशव जाधव, महेश होळकर, ज्ञानेश्वर इंगळे, लतीब तांबोळी, बिस्मिला शेख,संतोष ब्रम्हेचा ,संजय ट्रले, मंगेश गवळी,अफजल शेख, महेश पाटील, लतीफ शेख, प्रा. किशोर गोसावी, युनुस तांबोळी, रमेश खोडके, ज्ञानेश्वर पाटील, राहुल शेजवळ, संदीप गायकर आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.