बिवलकर लेनमधील बंदिस्त वाडा कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:14 AM2019-07-09T01:14:39+5:302019-07-09T01:14:59+5:30
मेनरोड येथील बिवलकर लेनमधील धोकादायक झालेला एक वाडा संततधारेत सकाळच्या सुमारास अचानक कोसळला. सकाळची वेळ असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
नाशिक : मेनरोड येथील बिवलकर लेनमधील धोकादायक झालेला एक वाडा संततधारेत सकाळच्या सुमारास अचानक कोसळला. सकाळची वेळ असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती तत्काळ परिसरातील रहिवाशांनी महापालिका अग्निशम दलाला कळविली. काही वेळेत अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी धोकादायक वाड्याची पाडणी करून धोकादायक झालेला भाग उतरवून घेतला.
याबाबत महापालिका आपत्ती व्यवस्थापन सूत्रांनी दिलेली माहिती अशी, शहरातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मेनरोड परिसरात महापालिकेच्या पूर्व विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला एक बंद वाडा पावसाच्या पाण्यामुळे कोसळला. घटनेची माहिती मनपा प्रशासनला तत्काळ कळवूनदेखील उशिराने काही कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी हा परिसर आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगून तेथून काढता पाय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी रहिवाशांनी
सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत पुन्हा नागरिकांनी माहिती दिली. त्यानंतर हाकेच्या अंतरावर असलेल्या मनपा कार्यालयापासून काही कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी धोकादायक झालेला वाड्याचा अजून काही भाग उतरवून घेतला.
पंचवटी, जुने नाशिक या भागात गावठाणचा असल्यामुळे येथे मोठ्या संख्येने जुने वाडे आहेत. बहुतांश वाडे धोकादायक स्थितीत असून, काही वाडे बंद आहेत तर काही वाड्यांमध्ये नागरिक वास्तव्य करून आहे. धोकादायक झालेल्या वाड्यांवर तातडीने उपाययोजना करून कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
अनेकदा या भागातील धोकादायक वाड्यांबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली आहे, मात्र त्यावर उपाय काढला जात नसल्याने पावसाळ्यात दुर्घटना घडत आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या बंद वाड्याच्या मालकाचाही थांगपत्ता पालिकेला लागत नाही. पालिका प्रशासन केवळ धोक्याचे फलक झळकावून औपचारिकता पूर्ण करतात, मात्र धोका अद्याप आहे तसाच आहे.
- रणजित दुसानीस, रहिवासी
या पडीत वाड्याचा त्रास आम्हाला सतत होत आहे. या वाड्याचा सारखा थोडा थोडा भाग पडत असतो त्यामुळे आम्हाला वाड्याजवळून जाताना भीती दाटून येते. महापालिकेने या वाड्यावर तातडीने उपाय काढावा.
- इंदूबाई खैरे, रहिवासी