बांगलादेशी मुलीची तस्करी : संशयित आरोपी माजिदा अद्याप फरार सिन्नरमधील कुंटणखान्याच्या ‘नानी’सह तिघांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:10 AM2017-12-17T01:10:40+5:302017-12-17T01:10:55+5:30
बांगलादेशी मुलीची देहविक्रयसाठी खरेदी करणाºया सिन्नरमधील मुसळगावच्या कुंटणखान्याची मालकीण संशयित नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणेसह पीडितेवर बलात्कार करणारा नानीचा मुलगा संशयित विशाल नंदकिशोर गंगावणे व दलाल सोनू नरहरी देशमुख या तिघा संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
नाशिक : बांगलादेशी मुलीची देहविक्रयसाठी खरेदी करणाºया सिन्नरमधील मुसळगावच्या कुंटणखान्याची मालकीण संशयित नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणेसह पीडितेवर बलात्कार करणारा नानीचा मुलगा संशयित विशाल नंदकिशोर गंगावणे व दलाल सोनू नरहरी देशमुख या तिघा संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित मुलीला देहविक्रयाच्या नरकात ढकलणारी तिची मावशी व काही दलाल अद्याप फरार असून, त्यांचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत. वेश्या व्यवसायासाठी मावशीने आपल्या भाचीला बांगलादेशामधून भारत फिरविण्याच्या बहाण्याने आणत सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणाºया कुंटणखाण्याच्या ‘नानी’ला दहा महिन्यांपूर्वी विकल्याची धक्कादायक माहिती बुधवारी पीडित मुलीने सांगितलेल्या आपबितीनंतर अवघे राज्य हादरले होते. पीडित मुलीचा सौदा ‘नानी’ने मुंबईच्या कुंटणखान्यासाठी केला आणि काही महिने मुंबईला पीडित मुलगी राहिली व तेथून पुन्हा तिला कोलकात्यात देहविक्र यासाठी विकले गेले, असा तिचा संपूर्ण प्रवास पीडित मुलीने बुधवारी नाशिकमध्ये येऊन माध्यमांसमोर मांडला. यानंतर ग्रामीण पोलीस दलासह अवघ्या राज्याला हादरा बसला. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी याबाबत दखल घेऊन तत्काळ उपअधीक्षक विशाल गायकवाड यांना त्वरित तपासचक्रे फिरवून संशयित आरोपींना अटक करण्याचे फर्मान बजावले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने सिन्नर येथे जाऊन संशयित नानीचा मुलगा व दलालाला बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले व गुरुवारी नानीच्या मुसक्या आवळल्या. या
सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सिन्नर औद्योगिक वसाहत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून पुढे आले आहे. सिन्नर पोलिसांनी दहा महिन्यांपूर्वी दखल घेऊन बांगलादेशी मुलीची खरेदी करणाºया ‘नानी’ला खाकीचा हिसका दाखविला असता तर कदाचित ती मुलगी मुंबई येथून पोलिसांना मिळाली असती व तिचा कोलकात्याचा ‘सौदा’ टळला असता अशी चर्चा सुरू आहे. एकूणच या प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्णासह राज्याचे लक्ष लागले असून पीडित मुलगी बांगलादेशला तिच्या कुटुंबापर्यंत कधी पोहचणार याकडे लक्ष लागले आहे.
जुन्या नाशिकमधून दोघांना अटक
नाशिक बांगलादेशी मुलीची देहविक्रीसाठी दहा महिन्यांपूर्वी तिच्या मावशीकडून सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील कुंटणखान्याच्या ‘नानी’ला विक्री केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोघा संशयितांना जुने नाशिकमधून अटक केली आहे. बांगलादेशी युवतीला खोटे बोलून तिची मावशी माजिदा अब्दुल हिने दलालामार्फत भारतात पोहचविले. या प्रकरणात माजिदा अद्याप फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या पथकाने जुन्या नाशिकमधून संशयावरून आसिफ फारूख शेख (२६, रा. चौकमंडई), सिद्धार्थ गौतम सोनकांबळे (२१, रा.भीमवाडी) या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एकूणच बांगलादेशी युवतीच्या तस्करीच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या प्रकरणात बहुसंख्य संशयितांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तीन पथके तपासासाठी नियुक्त केली आहेत.