बंगाली डॉक्टर निघाला बांगलादेशी नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:42 AM2019-01-29T01:42:00+5:302019-01-29T01:42:39+5:30
आठवी पास झालेला पिंपरी हवेलीचा कथित बंगाली डॉक्टर रतन तरुण चक्रबोती बांगलादेशचा नागरिक असल्याचे नांदगाव पोलिसांच्या तपासात सिद्ध झाले. नांदगाव पोलिसांनी त्याच्या विरोधात पारपत्र अधिनियम व विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे,
नांदगाव : आठवी पास झालेला पिंपरी हवेलीचा कथित बंगाली डॉक्टर रतन तरुण चक्रबोती बांगलादेशचा नागरिक असल्याचे नांदगाव पोलिसांच्या तपासात सिद्ध झाले. नांदगाव पोलिसांनी त्याच्या विरोधात पारपत्र अधिनियम व विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक रागसुधा यांनी दिली. न्यायालयाने त्याची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
२००९ मध्ये बांगलादेशी दलालाच्या माध्यमातून त्याने भारतात प्रवेश केला. त्यानंतर तो नांदगाव तालुक्यात पिंपरी हवेली येथे स्थायिक होऊन कपड्याचा व्यवसाय करत होता. दरम्यान त्याने बंगाली डॉक्टर म्हणून प्रसिद्धी मिळविली. पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र खोटेपणाने प्राप्त केले. या कागद पत्रांच्या आधारे बांगलादेशी ही मुळ ओळख लपवून त्याने भारतीय पासपोर्ट मिळविला.
त्यानंतर रतन चक्र बोती भारतीय नागरीक म्हणून बांगलादेशात जाण्यासाठी निघाला असता. हरदासपूर (प. बंगाल) येथील मुख्य इमिग्रेशन अधिकारी यांना त्याची कागदपत्रे तपासतांना त्याची आई यापूर्वी भारतात येऊन गेल्याचा संदर्भ मिळाला , येथेच चक्र बोतीचा पर्दाफाश झाला. इमिग्रेशनच्या अधिकाऱ्याने हे कोडे सोडवले. रतनच्या पासपोर्टवर असलेल्या माहितीमध्ये तुलू चक्र बोती हे त्याच्या आईचे नाव होते. तुलू हे नाव यापूर्वी भारतात बांगलादेशी पासपोर्ट वर येऊन गेलेल्या बांगलादेशी महीलेचे आहे. हे लक्षात आल्याने हरीदासपुरच्या अधिकाºयांनी रतनचा पासपोर्ट रद्द करून वरीष्ठ पातळीवरून सूत्रे हलवली आणि नांदगावचे पोलीस या तोतया नागरीकाच्या घरी पोहोचले. दरम्यान जेमतेम ८ वी पर्यन्त शैक्षणीक मजल मारलेल्या रतनने डॉक्टर (बंगाली) म्हणून पिंपरी हवेली परीसरात मान्यता मिळविली होती. याचा प्रत्यय त्याला ताब्यात घेतांना झालेल्या स्थानिक नागरीकांच्या विरोधातून आला.
भारतीय पासपोर्ट मिळवितांना उपरोल्लिखीत ओळखपत्र सादर केल्याने व त्याच्या नावावर गुन्ह्याची नोंद नसल्याने तत्कालीन नांदगाव पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी त्याला ना हरकत दाखला दिला. अशी माहिती फिर्यादी पोलीस शिपाई पंकज देवकाते यांनी एफ. आय. आर मध्ये दिली आहे. नमूद पासपोर्टच्या आधारे तो हरीदासपूर मार्गे बांगला देशात जाण्याच्या तयारीत असतांना इमिग्रेशन अधिकारी यांच्या हुशारीमुळे तो पकडला गेला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, हवालदार रमेश पवार, पोलीस शिपाई पंकज देवकाते पुढील तपास करत आहेत.
बोगस डॉक्टर्सच्या सर्वेक्षणात रतन चक्र बोती आपल्या रडारवर आलाच नाही. तो वैद्यकीय प्रक्टीस करतो याची माहिती नव्हती. तालुक्यात पाच बंगाली डॉक्टर्स आहेत. ते नेचरोपॅथी पद्धतीने उपचार करतात. धाडी टाकल्या असतांना अॅलोपॅथीची औषधे त्यांच्याकडे सापडली नाहीत. - डॉ.अशोक ससाणे, तालुका वैद्यकीय अधिकारी