बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून ६५ लाखांचा अपहार
By admin | Published: November 26, 2015 11:04 PM2015-11-26T23:04:08+5:302015-11-26T23:04:48+5:30
बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून ६५ लाखांचा अपहार
नाशिक : बँकेतील खात्याचा पासवर्ड हॅक करून चोरट्यांनी नाशिकमधील एका व्यावसायिकाच्या बँक खात्यातून तब्बल ६५ लाख रुपये स्वत:च्या विविध बँक खात्यांत वर्ग करून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश प्रकाश बदलानी (३७, पूनम अपार्टमेंट, राका कॉलनी) यांचे बँक आॅफ इंडियामध्ये खाते आहे़ संशयिताने बदलानी यांच्या बँक खात्यात समाविष्ट केलेला मोबाइल नंबर ९३७३९०११९१ हा बंद केला व याच नंबरचे दुसरे सीमकार्ड घेतले़या सीमकार्डवरील नंबर संगणकावर टाकून बदलानी यांच्या बँक खात्याची सर्व माहिती मिळवून पासवर्ड हॅक केला़ यानंतर संशयिताने बदलानी यांच्या बँक खात्यात असलेली ६५ लाख दहा हजार रुपयांची रक्कम स्वत:च्या आयसीआयसीआय बँक सांताक्रुझ (मुंबई), विजया बँक (मुंबई), एचडीएफसी बँक (गोमतीनगर, उत्तर प्रदेश) या खात्यावर वर्ग करून फसवणूक केली़
बदलानी हे नेहमीप्रमाणे बँकेत गेले असता खात्यातील मोठी रक्कम वर्ग झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी बँक प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांनी तांत्रिक बाब असल्याने पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला़ या प्रकरणी बदलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात आयटी अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़