बँकेच्या व्यवस्थापकास लाच घेताना अटक
By admin | Published: May 8, 2017 01:12 AM2017-05-08T01:12:49+5:302017-05-08T01:12:57+5:30
सिन्नर : तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये लाच स्वीकारताना सिन्नर व्यापारी बॅँकेचे व्यवस्थापक संजय रेवगडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शेतजमीन विक्रीकरिता ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये लाच स्वीकारताना सिन्नर व्यापारी सहकारी बॅँकेचे व्यवस्थापक संजय काशीनाथ रेवगडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी अटक केली.
तक्रारदार यांनी सिन्नर व्यापारी बॅँकेकडून शेतजमिनीवर कर्ज घेतले होते. सदर शेतजमीन विक्रीसाठी तक्रारदार यांना बॅँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे होते. बॅँकेचे प्रशासक तथा सहायक निबंधक यांच्याकडून तुम्हाला मी ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगत रेवगडे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाच मागितली होती.
याबाबत संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयात तक्रार दिली होती. त्यानुसार सापळा रचत तडजोडीअंती ठरविण्यात आलेली ३५ हजार रुपये लाचेची रक्कम सिन्नर व्यापारी बॅँकेत स्वीकारताना रेवगडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले.