ग्रामीण भागातील खातेदारांना बँक मित्र योजनेमुळे दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:25 PM2020-06-19T22:25:40+5:302020-06-20T00:25:16+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून राज्यासह देशभरात लॉकडाऊन व जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. मात्र या संकट काळातही बॅँक मित्र योजनेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव निंबायती : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून राज्यासह देशभरात लॉकडाऊन व जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. मात्र या संकट काळातही बॅँक मित्र योजनेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनमध्ये सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून देशातील महिलांच्या जनधन बँक खात्यात दरमहा पाचशे रुपये व उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत तीन मोफत गॅस सिलिंडरचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यात जमा झाल्याने पैसे काढण्यासाठी खातेदारांची बँकांसमोर सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून मोठी झुंबड उडत असे. वेळ प्रसंगी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत असे.
शहरातील ही स्थिती नित्याचीच झाली असताना ग्रामीण भागात मात्र मिनी बँक तथा बँक मित्र योजनेमुळे बँक खातेदारांना लॉकडाऊनच्या काळात काहीसा दिलासा मिळाला आहे. गावातील बँक खातेदारांना तालुक्याच्या गावी जाऊन बँकेतून पैसे काढण्यापेक्षा आपल्या
गावातच बँक मित्रांच्या साह्याने आधारकार्ड खात्याला जोडून खातेदाराच्या हाताचा ठसा घेऊन बँकेची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
बँक आॅफ महाराष्ट्र निमगाव शाखेच्या जळगाव निंबायती
येथील मिनी बँकेमुळे चोंडी, जळगाव, पोमनर वाडी, वानेवाडी, घोडेगाव चौकी आदी परिसरातील नागरिकांना विशेषत: महिला व वृद्धांना लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावातच बँकेची सुविधा
उपलब्ध झाल्याने तासन्तास बँकेसमोर रांगेत ताटकळत उभं राहण्याच्या त्रासापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
खातेदारांना एकावेळी जास्तीत जास्त दहा हजार रु पयांपर्यंतची रक्कम खात्यातून काढता येते, तर वीस हजार रु पयांपर्यंतचा भरणा आपल्या खात्यात करता येतो. यावेळी खातेदारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून त्यांचे हात निर्जंतुकीकरण करूनच बँक मित्र सेवा देत आहेत. बँक आॅफ बडोदा सोनज शाखेच्या कौळाणे (नि.) येथील मिनी बँकेचा लाभ परिसरातील कौळाणे, नगाव, वºहाणे, वºहाणेपाडा,
काळेवाडी, पंढळओहोळ आदी गावांना झाला आहे.
बँक आॅफ बडोदाचे संस्थापक महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जन्मभूमीत त्यांच्या सन्मानार्थ मिनी बँक सुरू करण्यात आली. लॉक- डाऊनमध्ये बँक व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाने सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोज व सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करून सामान्य व गरजू खातेदारांना मिनी बँकेमार्फत सेवा पुरविण्यात आली. लॉकडाऊनच्या संकट समयी खातेदारांना पैसे मिळणेकामी त्यांचा वेळ व त्रास कमी करून सेवा दिल्याचे समाधान आहे.
- चंद्रकांत कुलकर्णी, बँक मित्र, कौळाणे (निं)