नववर्ष सेलीब्रेशनला नोटबंदीचा फटका

By admin | Published: December 29, 2016 11:55 PM2016-12-29T23:55:44+5:302016-12-29T23:55:44+5:30

एरव्ही मावळत्या वर्षाला निरोप व उगवत्याचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी आठ ते दहा दिवसांपासून नियोजनात गर्क असलेल्या सामान्य नागरिकांनी यंदा नोटबंदीमुळे आपल्या उत्साहाला

Banknote to Novel Celebration | नववर्ष सेलीब्रेशनला नोटबंदीचा फटका

नववर्ष सेलीब्रेशनला नोटबंदीचा फटका

Next

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 29  एरव्ही मावळत्या वर्षाला निरोप व उगवत्याचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी आठ ते दहा दिवसांपासून नियोजनात गर्क असलेल्या सामान्य नागरिकांनी यंदा नोटबंदीमुळे आपल्या उत्साहाला मुरड घालण्याचे ठरविले असून, त्याचाच भाग म्हणून की काय ‘थर्टीफर्स्ट’साठी तयारीत असलेल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉन्सचालकांनीही हात आखडता घेत मनोरंजनाचे कार्यक्रमच रद्द करण्यावर भर दिला आहे.
दरवर्षी थर्टीफर्स्ट झोकात साजरा करणाऱ्यांच्या तयारीचा अंदाज घेऊन विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉन्समध्ये ३१ डिसेंबरच्या उत्तररात्रीपर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यात आॅर्केस्ट्रा, नृत्याचे प्रकार, करमणुकीचे प्रयोग यांसह जेवणावर व मद्यपानावरही विशेष सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो, साधारणत: पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचे तिकीट आकारून ठेवलेल्या या कार्यक्रमांना ग्राहकांचाही तितकाच प्रतिसाद मिळत असल्याने असे कार्यक्रम आयोजित करण्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांमध्ये चढाओढही लागते. गेल्या वर्षी शहर व जिल्ह्यातील काही मोठ्या हॉटेल्सने अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले त्याची संख्या बाराच्या आसपास होती व आठ हॉटेल्सचालकांनी थर्टीफर्स्टला काहीच कार्यक्रम ठेवले नसल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाच्या करमणूक विभागाला करून दिले होते. यंदा मात्र नोटबंदीचा फटका थर्टीफर्स्टच्या उत्साहाला बसला आहे. ग्राहकांमध्ये उत्साहच दिसत नसल्याने थर्टीफर्स्ट ‘कॅश’ करण्यासाठी सरसावणारे हॉटेल्सचालकांनी माघार घेतली आहे. जिल्हा करमणूक विभागाकडे फक्त तीन हॉटेल्सचालकांनी करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्यासाठी अशा प्रकारची अनुमती मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत, तर वीसहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉन्स चालकांनी कोणतेही कार्यक्रम सादर केले जाणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र भरून दिले आहे. तिकीट विक्रीतून करमणुकीचे कार्यक्रम सादर केल्यास शासनाला २० टक्के करमणूक कर शुल्कापोटी महसूल मिळतो.
 
मद्यपरवान्याचाही परिणाम
३१ डिसेंबर रोजी मद्यपानासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून एक दिवसाचा परवाना दिला जातो, यंदा मात्र शासनाने अशा प्रकारचा परवाना न देण्याचे ठरविले आहे, त्यातच महामार्ग व राज्यमार्गावरील परमीट रूम व बिअर बार यांच्यावरही शासन निर्बंध लावत असल्यामुळे हॉटेल्सचालकांनी ३१ डिसेंबर रोजी नियमित व्यवसाय करण्याचे ठरविल्याने कार्यक्रम घटल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Banknote to Novel Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.