जिल्ह्यातील बॅँकांमध्ये गर्दी कायम

By Admin | Published: November 16, 2016 12:45 AM2016-11-16T00:45:38+5:302016-11-16T00:42:05+5:30

ठिकठिकाणी रांगाच रांगा : ग्रामीण भागातील ग्राहकांची तारांबळ

The banks in the district continued to crowd | जिल्ह्यातील बॅँकांमध्ये गर्दी कायम

जिल्ह्यातील बॅँकांमध्ये गर्दी कायम

googlenewsNext

नाशिक : बॅँकांमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी सलग सहाव्या दिवशीही रांगा कायम असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सोमवारी सुटीनंतर आज मंगळवारी पुन्हा नोटा बदलण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी पाहावयास मिळत आहे. नोटा जवळ आहेत पण सुटे मिळत नसल्याने साधी भाजी खरेदी करणे ग्राहकांना कठीण होऊन बसले आहे. हीच परिस्थिती बहुतांश व्यावसायिकांचीदेखील झाली आहे. किराणा किंवा इतर व्यापारी मोठ्या नोटा घेत असल्याने घाऊक खरेदी करताना ग्राहकांची फारशी अडचण झाली नाही, मात्र छोटे विक्रे ते आणि किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांची आर्थिक अडचण झाल्याने अनेक ठिकाणी वादविवाद घडत होते.
उमराणे बाजार समिती बंद
उमराणे : पाचशे व हजार रु पयांच्या नोटांचे चलन बंद झाल्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे अदा करण्यासाठी व्यापारीवर्गाकडे नवीन छोट्या व मोठ्या स्वरूपातील नोटांचे चलन उपलब्ध होत नसल्याने बुधवारपासून (दि. १६) नवीन चलन उपलब्ध होईपर्यंत काही दिवसांसाठी उमराणे बाजार समिती बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सभापती विलास देवरे यांनी दिली. जिल्ह्यातील बहुतांशी बाजार समित्या पाचशे व हजार रु पयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने एक दोन दिवस आधीच बंद करण्यात आल्या होत्या. परंतु व्यापाऱ्यांकडे काही प्रमाणात चलन उपलब्ध असल्याने येथील बाजार समितीतील कांदा व भुसार माल खरेदी-विक्र ीचे व्यवहार सुरू होते. परिणामी अन्य बाजार समित्या बंद असल्याने येथील बाजार समितीत मागील आठवड्याच्या शेवटी उन्हाळ (गावठी) काद्यांची सुमारे ५६ हजार क्विंटल, तर लाल (पावसाळी) कांद्याची सुमारे २६ हजार क्विंटल इतकी प्रचंड आवक झाली होती. आवक असतानाही लाल कांद्याचे भाव तेजीत होते. उन्हाळ कांद्यास सर्वोच्च ९०० रु पये, तर लाल कांद्यास सर्वोच्च १८५० रु पये प्रतिक्विंटलपर्यंत भाव होता. परंतु चालू आठवड्यात नवीन चलनाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवणार असल्याने बुधवारपासून नवीन चलन उपलब्ध होईपर्यंत काही दिवसांसाठी उमराणे बाजार समिती बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय बाजार समिती सभापती व संचालक मंडळाने घेतला आहे. दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ कांद्याचे भाव तेजीत राहतील या अपेक्षेपोटी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे.
नागरिक मेटाकुटीस
अभोणा : पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा जमा करून नव्या नोटा घेण्यासाठी तिसऱ्या-चौथ्या दिवशीही सर्वच बँकांबाहेर तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले. रविवारीही बँका सुरू असल्याने गर्दी वाढलेली होती. नोटा जमा करण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी सर्वसामान्यांची अवस्था झाली आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून ५०० व १००० रु पयांच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यामुळे जुन्या नोटा बदलण्यासाठी व स्वीकारण्यासाठी नागरिकांची बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. बँकांमध्ये नवीन दोन हजाराच्या मर्यादितच नोटा असल्याने त्या बदलून घेणे सर्वांना शक्य झाले नाही. दुपारनंतर एटीएम मशीन व बँकांमध्ये खडखडाट दिसून आला. यामुळे बऱ्याच नागरिकांना रांगेत उभे राहून वेळ व दिवस वाया घालवावा लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
दुसरीकडे ज्या नागरिकांना दोन हजार रुपयांची नोट मिळाली त्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी व्यवहाराच्या ठिकाणी सुटे पैसे नसल्याने खरेदीसाठी अडचण निर्माण होत आहे.
चोरट्यांचा दहा, शंभरच्या नोटांवर डल्ला
घोटी : काळ्या पैशांवर अंकुश यावा यासाठी सरकारने चलनातील हजार व पाचशेच्या चलनी नोटा व्यवहारातून बाद केल्यानंतरही घोटी शहरातील घरफोड्या व चोऱ्यांचे प्रमाण काही थांबत नाही. दरम्यान, चोरट्यांनी जुन्या नोटांकडे पाठ फिरवीत आता घरगुती साहित्य चोरण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले असल्याने या घरफोड्या चोरीची उकल करणे पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे.  गेल्या चार महिन्यांपासून घोटी शहरात धाडसी घरफोड्या, दुकानाचे शटर तोडून चोऱ्या असे प्रकार सलगपणे घडत होते. मात्र हजार व पाचशे रु पयांच्या चलनी नोटा व्यवहारातून बाद झाल्यानंतर चोरी व घरफोडीच्या प्रकाराला लगाम मिळेल असे अभिप्रेत असताना चोरांनी मात्र शक्कल लढवीत घरफोडी करीत घरगुती वापराच्या वस्तू चोरण्यास सुरु वात केली आहे.  शहरातील डॉ. आंबेडकरनगरमधील अंजना दिलीप रोकडे या आपल्या कुटुंबासह मुंबई येथे लग्नासाठी गेल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन गॅस सिलिंडर, एक मोबाइल व दहा हजार रु पये रोख, केवळ दहा आणि शंभराच्या नोटा चोरट्यांनी लंपास केल्या. दरम्यान, रोकडे कुटुंब लग्नावरून आल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला.
त्यांनी याबाबत घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चोरट्यांनी पैशाऐवजी घरगुती वस्तूंना लक्ष्य केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.











 

Web Title: The banks in the district continued to crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.