नाशिक, निफाड कारखाना सुरू करण्याचे बॅँकेचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 04:11 AM2018-09-23T04:11:20+5:302018-09-23T04:11:41+5:30
कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या परंतु विक्रीही न करता येऊ शकलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावरच चालविण्यास देऊन त्यातून कर्जवसुली करण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत.
- श्याम बागुल
नाशिक - कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या परंतु विक्रीही न करता येऊ शकलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावरच चालविण्यास देऊन त्यातून कर्जवसुली करण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत.
त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. दोन्ही कारखान्यांसाठी चार खासगी कंपन्यांनी तयारी दर्शविली असली तरी, पाच ते सहा कोटी रुपये अनामत भरण्यास या कंपन्यांनी असमर्थता व्यक्त केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
नाशिक सहकारी कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे १५७, तर निफाड सहकारी कारखान्याकडे १२५ कोटी रुपये कर्ज अनेक वर्षांपासून थकले आहे. कर्जबाजारीपणा, खेळत्या भांडवलाचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या देणी यामुळे आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेले हे दोन्ही कारखाने बंद पडून जिल्हा बँकेने थकबाकीपोटी जप्त केले आहेत.
त्यामुळे कारखान्याकडे असलेल्या थकबाकीवर चक्रवाढ व्याजाचा डोंगर दिवसागणिक वाढत चालला आहे. शिवाय कारखाना सुरू करण्यासाठी करण्यात आलेले राजकीय व शासकीय प्रयत्नही अनेक वेळा फसल्यामुळे बँकेने कारखाना विक्री करण्यासाठी वेळोवेळी जाहिराती काढल्या, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
शासनानेच सहकारी साखर कारखाने विक्रीवर निर्बंध लावल्यामुळे बॅँकेने विक्रीचा निर्णय बदलून भाडेतत्त्वावर चालविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.