बँक, किराणा दुकानांत नागरिकांची गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:14 PM2020-04-01T23:14:36+5:302020-04-01T23:15:05+5:30
कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या निमित्ताने मरण दारात उभे असताना नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. येथील बँकांत पैसे काढण्यासाठी व किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत असून, गाव परिसर हाउसफुल्ल असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पाटोदा : कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या निमित्ताने मरण दारात उभे असताना नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. येथील बँकांत पैसे काढण्यासाठी व किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत असून, गाव परिसर हाउसफुल्ल असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आलेख वाढतच चालला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण देशात लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. मात्र पाटोदा परिसरात या बंदीचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. शासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, अस्थापना बंद केले आहेत. प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखणे आवश्यक असताना या उपाययोजनाच सर्रास पायदळी तुडवल्या जात असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची झालेली गर्दी, अगदी एकमेकांना खेटून उभे राहात असल्याचे चित्र बँक व किराणा दुकानांत दिसून आल्याने पोलीस व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या गर्दीचे विलगीकरण करत सुरक्षित अंतर राखण्याबाबत प्रबोधन केले. दरम्यान, किराणा व भाजीपाला खरेदीसाठी सवलतीचा नागरिक गैरफायदा घेत आहेत़