नर्मदेच्या तीरावर साधनेमुळे मिळते मन:शांती : स्थितप्रज्ञानंद सरस्वती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 01:25 AM2020-02-12T01:25:41+5:302020-02-12T01:26:09+5:30
नर्मदा नदीचे दर्शन झाल्यास एकप्रकारचे बळ प्राप्त होते. नर्मदेच्या तीरावर साधना केल्याने सत्संग प्राप्त होऊन मन व चित्त शांत होते. असे शुद्ध आणि शांत मन आनंदाचे कारण ठरून संत तुकाराम महाराज यांच्या ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संदेशाप्रमाणे कार्यात निश्चित यशाची प्राप्ती होत असल्याचे प्रतिपादन स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी केले.
नाशिक : नर्मदा नदीचे दर्शन झाल्यास एकप्रकारचे बळ प्राप्त होते. नर्मदेच्या तीरावर साधना केल्याने सत्संग प्राप्त होऊन मन व चित्त शांत होते. असे शुद्ध आणि शांत मन आनंदाचे कारण ठरून संत तुकाराम महाराज यांच्या ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संदेशाप्रमाणे कार्यात निश्चित यशाची प्राप्ती होत असल्याचे प्रतिपादन स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी केले.
पुण्यश्लोक शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पार्वतीबाई गोसावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नर्मदा परिक्रमा प्रवचनमालेचे तिसरे पुष्प मंगळवारी (दि.११) त्यांनी गुंफले. स्थितप्रज्ञानंद सरस्वती म्हणाल्या, भगवंत मनुष्याची मानसिक तपासणी करत असतो. त्यामुळे मन शुद्ध आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. केवळ आपल्याला त्रास होतो म्हणून दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करणे चुकीचे आहे. दु:खी होण्यासाठी, दुसºयाला त्रास देण्यासाठी, संतप्त होण्यासाठी किरकोळ कारण पुरेसे असते. अशा अशांत मन:स्थितीमुळे मनुष्याच्या जीवनात दु:खाचे, कष्टाचे प्रसंग निर्माण होतात. परंतु, असे कष्टांचे अनेक प्रसंग केवळ शांत नर्मदेच्या दर्शनाने नष्ट होतात एवढे सामर्थ्य नर्मदेत आहे. नर्मदेच्या दर्शनाने मोक्षाचीही प्राप्ती होते, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी शैलेश गोसावी व रुचिरा गोसावी यांनी स्वामिनींना वंदन केले. यावेळी डॉ. मो. स. गोसावी, डॉ. सुनंदा गोसावी, कल्पेश गोसावी, प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, प्राचार्य प्रदीप देशपांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.