संमेलनाच्या निधीसाठी आता बँका ‘रडारवर’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:19 AM2021-02-26T04:19:31+5:302021-02-26T04:19:31+5:30
नाशिक : साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी लागणाऱ्या निधीसाठी आमदार, खासदार आणि नगरसेवक यांच्याकडून निधीसाठीची ‘फिल्डिंग’ लावल्यानंतर आता आयोजकांनी त्यांचा मोर्चा ...
नाशिक : साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी लागणाऱ्या निधीसाठी आमदार, खासदार आणि नगरसेवक यांच्याकडून निधीसाठीची ‘फिल्डिंग’ लावल्यानंतर आता आयोजकांनी त्यांचा मोर्चा जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांकडे वळवला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एका प्रख्यात ‘बँकर’कडेच ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आधीच ‘एनपीए’ग्रस्त झालेल्या बँकांना हे ‘सांस्कृतिक औदार्य’ दाखवणे शक्य नसूनही काहीतरी उसने अवसान आणून ‘योगदान’ देण्याची गळ घातली जात असल्याची चर्चा घडू लागली आहे.
साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी प्रारंभी २ कोटींपर्यंत ठरविण्यात आलेले बजेट आता वाढत जाऊन ४ कोटींपर्यंत लागणार असल्याचा आयोजकांचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाकडून प्राप्त रक्कम, लोकप्रतिनिधींकडून मिळणारी प्रस्तावित रक्कम, स्थानिक उद्योजक, व्यावसायिकांनी दिलेली देणगी, नाशिककरांनी दिलेले योगदान, स्टॉल्स उभारणीतून मिळणारा निधी, अडीच कोटींहून अधिक निधी उभारणी पूर्ण झाली आहे. मात्र, सुधारित प्रस्तावानुसार आता संमेलनासाठीचे आर्थिक लक्ष्य हे ४ कोटींवर जाऊन पाेहोचले आहे. त्यामुळे उर्वरित निधीची पूर्तता कशी करायची, याबाबतची काळजी आयोजकांना वाटत होती. त्यासाठी मग गावोगाव फिरून निधी गोळा करणे, समित्यांमधील सदस्यांना पावती फाडण्यास सांगणे यासह विविध पर्यायांचा अवलंब करण्यात येत आहे. मात्र, तेवढ्यावरदेखील अपेक्षित निधीचे लक्ष्य गाठणे शक्य होणार नसल्याचे आयोजकांच्या लक्षात आले. त्यामुळेच संमेलनाच्या मुख्य कार्यकारिणीतील प्रमुख आणि समिती प्रमुखांनी मिळून कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या जिल्ह्यातील बँकांकडून संमेलनासाठी ‘योगदान’ मिळवण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अनेक नागरी सहकारी बँका, पतसंस्थांचे संस्थापक, अध्यक्ष आणि सर्वेसर्वा असणाऱ्यांना अनौपचारिक भेटीची निमंत्रणे गेली. या मान्यवरांना संबंधितांनी भेटीचे कारणही सांगितले न गेल्याने ते बुचकळ्यात पडले. मात्र, एकमेकांशी संपर्क झाल्यानंतर त्या कारणाचा त्यांना उलगडा झाला. त्यातदेखील ज्यांच्याकडून निमंत्रण गेले ते टाळता येण्याजोगे व्यक्तिमत्त्व नसल्याने संबंधित बँकांचे प्रमुख निर्धारित ठिकाणी पोहोचल्यानंतर विषय उलगडला गेला.
इन्फो
तब्बल १० लाखांचे ‘टार्गेट’
काही मोठ्या नागरी बँकांच्या प्रमुखांना संमेलन निधीसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, एनपीए आणि अन्य आर्थिक समस्यांचा पाढा त्यांनी वाचल्याचे समजते. तरीदेखील किमान १० लाखांचे सांस्कृतिक औदार्य दाखवण्याचे आवाहन करून त्यांना एकप्रकारे तेवढे टार्गेटच देण्यात आले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित बँक प्रमुखांची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशीच अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.
लोगो
साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.