खरीप कर्ज वाटपात बँकांची आडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:20 AM2021-08-19T04:20:20+5:302021-08-19T04:20:20+5:30
नाशिक : खरीप हंगामात शेतकऱ्यांना २ हजार ७८० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असतानाही खासगी तसेच सरकारी ...
नाशिक : खरीप हंगामात शेतकऱ्यांना २ हजार ७८० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असतानाही खासगी तसेच सरकारी बँकांकडून आडकाठी केली जात असल्याने उद्दिष्ट पूर्ण होणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या केवळ ५४ टक्के इतकेच कर्ज वाटप झाल्याचे समेार आले आहे.
सन २०२१-२२ च्या खरीप हंगामासाठी २ हजार ७८० कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. जिल्हा तसेच खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात येत आहे. मात्र, जिल्हा बँकवगळता अन्य बँकांकडून पुरेसा प्रतिसाद नसल्याने कर्ज वाटपात जिल्ह्याची कामगिरी उंचावलेली दिसत नाही. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यांना याबाबतचा आढावादेखील घेतला आहे. मात्र अजूनही त्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.
बँकांना २ हजार ७८० कोटी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेला १ हजार ८७२ कोटींचे उद्दिष्ट असताना वाटप ९३५ कोटी इतके झाले आहे. खासगी बँकेला ३६५ कोटींचे उद्दिष्ट असताना त्यांनी केवळ १४५ कोटींचे वाटप करण्यात आले आहे तर ग्रामीण बँकेने ८ कोटींपैकी ४.३५ कोटींचे वितरण केलेले आहे. जिल्हा बँकेची कामगिरी मात्र चांगली राहिली आहे. ५३५ कोटी ४२९ कोटींचे कर्ज वाटप केेलेले आहे. जिल्ह्यातील खरीप कर्जाची एकूण आकडेवारी पाहिली तर कर्ज वाटपाची टक्केवारी अवघी ५४ टक्के इतकी असून आतापर्यंत १ हजार ५१३ कोटी कर्ज वाटप करण्यात आले.
कोरोनाचा संकट काळ आणि खरिपाची परिस्थिती पाहता बँकांनी शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्यावर कर्जाचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील दरवेळी याबाबतचा आढावा घेऊन बँकांचा सूचना दिल्या जातात. पालकमंत्र्यांनीही बँकांना याबाबतचे आवाहन केलेले आहेे. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसते. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते. मात्र, कर्ज देण्यास बँकांकडून आखडता हात घेतला जात असल्याचे आकडेवारीवरून दिसते.
शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेचा अपवादवगळता खासगी, ग्रामीण व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जवाटप कासवगतीने सुरू आहे. थकबाकी, एनओसी किंवा कर्जफेडीच्या कारणावरून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला जात आहे. त्यास जिल्हा बँक अपवाद असून जिल्हा बँकेला ५३५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी ४२९ कोटींचे कर्ज वाटप केले आहे तर राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँका कर्जवाटपात हात आखडता घेताना दिसत आहेत.