निवडणूक काळात बॅँकांनी व्यवहारांची माहिती सादर करावी - जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 05:54 AM2019-03-21T05:54:02+5:302019-03-21T05:56:30+5:30
निवडणूक काळात बँकांनी बँकेत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
नाशिक : निवडणूक काळात बँकांनी बँकेत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक खर्चाबाबतच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मांढरे पुढे म्हणाले, निवडणूक आचारसंहिता कालावधीत बँक खात्यातून आरटीजीद्वारे एका बँक खात्यातून अनेक व्यक्तींच्या खात्यात जमा होण्यावरही बँकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खातेदाराच्या किंवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या खात्यात जमा करणे किंवा काढणे यासाठी संबंधित खातेदाराने प्रतिज्ञापत्र बँकेकडे सादर करणे गरजेचे आहे. निवडणूक काळात अवैध रोकड नियंत्रणासाठी भारत निवडणूक आयोग आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार एटीएम मशीन्समध्ये रोकड जमा करताना वाहतुकीसाठी विहित कार्यप्रणालीनुसार वापर करावा. तसेच निवडणूक काळात खासगी विमान, हेलिकॉप्टर यांची सेवा पुरविताना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवाशाच्या बॅगेची तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आयकर विभागाने या प्रकरणी तत्काळ प्रतिसाद यंत्रणा निर्माण केली आहे. बँकांनी त्यांच्या व्यवहाराच्या वापरासाठी उपयोगात आणावयाच्या रोखीच्या व्यवहारासाठी लागणाºया रोकड रकमेसाठी वाहतुकीसाठी उपयोगात येणाºया वाहनांबाबत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या मार्गदर्शन
सूचनांची कटाक्षाने अंमलबजावणी करावी.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, आयकर विभागाचे सहसंचालक अमित सिंग, उपायुक्त आयकर मनोज सिन्हा, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंग राजपूत, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक बी. व्ही. बर्वे आदी उपस्थित होते.
आयकर विभागास कळविण्याच्या सूचना
निवडणूक कालावधीत राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवारांच्या खात्यातून १० लाखांहून अधिक रोख रक्कम काढणे किंवा जमा करण्याची माहिती मिळाल्यास त्यासंदर्भात आयकर विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे, अशा सूचनाही मांढरे यांनी दिल्या.