आपल्याच ग्राहकांना पैसे देण्यावर बॅँकांचा भर
By admin | Published: April 23, 2017 02:39 AM2017-04-23T02:39:56+5:302017-04-23T02:40:05+5:30
नाशिक : रिझर्व्ह बॅँकेकडून पुरेसे चलन मिळत नसल्याने खातेदार नाराज होत असल्याने आता बॅँकांनी एटीएमऐवजी बॅँकेतून रोख रक्कम देण्यास सुरुवात केली आहे
नाशिक : गेल्या पंधरवड्यापासून नोटांअभावी बॅँकिंग व्यवहारावर परिणाम झाले असून, रिझर्व्ह बॅँकेकडून पुरेसे चलन मिळत नसल्याने खातेदार नाराज होत असल्याने त्यावर उपाय म्हणून आता बॅँकांनी एटीएमच्या माध्यमातून पैसे देण्याऐवजी बॅँकेतून रोख रक्कम देण्यास सुरुवात केली आहे. अन्य बॅँकांचे एटीएम कार्डधारक एटीएममधून पैसे काढून नेत असल्याने मूळ खातेदार त्यापासून वंचित राहत असल्यामुळेच बॅँकांनी हे पाऊल उचलले असून, शहरातील एटीएममध्ये पैशांच्या खडखडाटीमागे हेदेखील एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोअर बॅँकिंग प्रणालीमुळे कोणत्याही बॅँकेचा एटीएम कार्डधारक कोणत्याही बॅँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतो. अगदी केंद्र सरकारने नोटाबंदी लादल्यानंतरही सर्वच बॅँकांच्या एटीएमच्या बाहेर ग्राहकांनी गर्दी केली होती. खातेदारांकडून थेट बॅँकेत जाऊन पैसे काढण्यापेक्षा एटीएममधून पैसे काढण्याला अधिक प्राधान्य दिले जाते ही वस्तुस्थिती असल्याने आजही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहक जात असले तरी, नोटांअभावी एटीएम बंद आहेत. रिझर्व्ह बॅँकेकडून चलन मिळत नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बॅँका व एटीएमच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. जवळपास ७० टक्के एटीएम नोटांअभावी बंद असून, सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकांची चेस्ट बॅँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बॅँकेलाही त्याची झळ बसली आहे. पैशांअभावी बॅँकांची पतही धोक्यात आल्याने खातेदार टिकवून ठेवण्याच्या स्पर्धेमुळे बॅँकांनी फक्त आपल्याच ग्राहकांना सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहरातील बहुतांशी बॅँकांच्या एटीएममध्ये नोटांचा खडखडाट असून, ज्या बॅँकांचे एटीएम बंद आहेत, त्या बॅँकांनी आपल्या खातेदारांसाठी बॅँकेत पैशांची सोय केली आहे. कारण दुसऱ्या बॅँकेच्या खातेदारांकडून एटीएमचा वापर होऊन पैसे काढून घेतले जात असल्याचे बॅँकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)