बापलेक करतात कोरोना मृतांचा अंतविधी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 06:34 PM2021-04-25T18:34:12+5:302021-04-25T18:35:50+5:30
गणेश शेवरे पिंपळगाव बसवंत : जागतिक महामारी असलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटीने थैमान घातले असून अनेक जण मृत्युमुखी पडत ...
गणेश शेवरे
पिंपळगाव बसवंत : जागतिक महामारी असलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटीने थैमान घातले असून अनेक जण मृत्युमुखी पडत आहे. मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक देखील पुढे येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कुटुंबांनाच त्यांचे नातेवाईक होऊन अग्निडाग द्यावा लागत आहे.
पिंपळगाव येथील बापलेक हेच कार्य करत समाजाप्रती आपले रुण व्यक्त करीत आहेत. जगभरातील लोक कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहेत. डॉक्टर, नर्सेस, पोलीस त्यांची जबाबदारी निभावत आहेतच पण सामान्य माणसंही या लढाईत मागे नाहीत. पिंपळगाव येथील स्मशानभूमीत रुग्णांचे अंत्यसंस्कार करणारे पंकज इरावार व त्यांचा १० वर्षांचा मुलगा अनिकेत इरावार सध्या अनेक कुटुंबांचा आधार बनले
आहेत.
कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असेल तरी हे इरावार बाप-लेक त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतात. मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणे हे काम पिढ्यान पिढ्या ते करत आले आहेत. मात्र कोरोना काळातही कोणीही मृतदेहाजवळ जात नाही ते काम पंकज व त्यांचा मुलगा तसेच ॲम्बुलन्सवरील चालक करत असल्याने त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पिंपळगाव बसवंत शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच बाधीत मृत्यूचा देखील आकडा वाढत स्मशानभूमीत मृतदेहाच्या रांगाच रांगा लागत आहे. मात्र संसर्गाच्या भीतीनं कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या जवळ त्यांच्या घरचे जात नाहीत. अशा परिस्थितीत कोरोना बाधित मृत व्यक्तींना सन्मानाने या जगातून निरोप देण्याचं काम पिंपळगाव शहरातील माणुसकीचे दर्शन देणारे पंकज इरावार
व त्यांचा मुलगा अनिकेत व ॲम्बुलन्स चालक करत आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचे मृतदेह त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन केले जाते मात्र कोणाला ही बाधा होणार नाही याची खबरदारी घेऊन अंतविधी करावा असे प्रशासना मार्फत सांगण्यात आले मात्र मृत्युमुखी पडलेल्या घरातीलच व्यक्ती कोविड ग्रस्त असतात त्यामुळे स्मशानभूमीत जाऊन या मृतदेहांचे अंत्यसंस्कार नातेवाईक करू शकत नाही त्यामुळे रुग्णालयातून कोणतीही भीती न बाळगता ॲम्बुलन्सवरील ड्रायव्हर स्मशानभूमीपर्यंत पोचवत असतात आणि स्मशानभूमीत पंकज व त्यांचा मुलगा पुढील अंत्यविधी कार्यकर्ते परंपरेनुसार करत आहेत.
आयुष्यात वाईट अवस्थेतले कित्येक मृतदेह पाहिले. पण ही परिस्थिती त्याहूनही वाईट आहे. जवळचे नातेवाईक रडतात. आमच्या माणसाला शेवटचं पाहू द्या म्हणून विनंती करतात आणि कोणीच काही करू शकत नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना लांब ठेवणं गरजेचं असतं. आम्ही त्यांना आश्वासन देतो, की अंतिम संस्कार तुमच्या धर्माप्रमाणेच होतील. सगळे विधी पार पाडले जातील. कशातही कसूर राहणार नाही. इतकं तर आम्ही त्यांच्यासाठी करूच शकतो.
- पंकज इरावार.
रुग्णांचे नातेवाईक देखील कोरोनाने मरण पावलेल्या घरातील व्यक्तींना शेवटच्या क्षणी हात लावत नाही मात्र माणुसकी जिंवत ठेवण्यासाठी पिंपळगाव बसवंत परिसरातील आम्ही रुग्णवाहिकेचे सर्व चालक मिळून त्या मृतदेहाला स्मशानभूमीत घेऊन जातो व तेथे पंकज इरावार यांच्या सहकार्याने अंत्यविधी करतो.
- प्रकाश पावले, ॲम्बुलन्स चालक पिंपळगाव.
चौकट...
बापाच्या मदतीला मुलगा आला धावून
आतापर्यंत पंकज इरावार हेच पिंपळगावच्या स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यविधी करत होते. मात्र कोरोना बाधित असलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यु होत असल्याने स्मशानभूमीत मृतदेहांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वडिलांच्या मदतीला त्यांचा दहा वषार्चा मुलगा अनिकेत हा मदतीला धावून आला आहे. व तो त्यांचा कामाचा भाग काहीसा हलका करण्याचा प्रयत्न करीत आहे.