बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!
By admin | Published: September 15, 2016 01:00 AM2016-09-15T01:00:42+5:302016-09-15T01:01:54+5:30
आज विसर्जन : दशदिनाच्या मंगलमय उत्सवाची सांगता; प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी
नाशिक : विघ्नहर्त्या गणरायाच्या दशदिनाच्या मंगलमय उत्सवाची सांगता गुरुवारी (दि. १५) अनंत चतुर्दशीला होत आहे. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पाला निरोप देण्याचा क्षण समीप येऊन ठेपल्याने गणेशभक्त विसर्जनाच्या तयारीत गुंतले आहेत. ‘बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या’, असे म्हणत गणेशभक्त भावपूर्ण वातावरणात वाजत-गाजत मिरवणुकीने जाऊन लाडक्या बाप्पाला निरोप देतील. त्यासाठी महापालिकेच्या वतीने विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरात विसर्जनस्थळी चोख व्यवस्था तैनात ठेवण्याबरोबरच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी सुमारे २९ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने दहा दिवस वातावरण चैतन्याने भारलेले होते. गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळांनी साकारलेल्या चित्तवेधक आरास पाहण्यासाठी रस्त्यांवर गणेशभक्तांचा महापूर सारखा वाहत होता. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा मंडळाच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. यंदा दरवर्षीप्रमाणे पौराणिक, धार्मिक देखाव्यांवर अधिक भर राहिला तर प्रबोधनपर देखाव्यांनीही नाशिककरांकडून दाद मिळविली. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आता बाप्पाला निरोप देण्याचा क्षण समीप येऊन ठेपला आहे. यंदा शाडूमातीच्या गणपती मूर्तींची मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठापना झाल्याने पर्यावरणपूरक विसर्जनालाही गणेशभक्तांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. शहर गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग : नाशिक शहरातील मुख्य मिरवणुकीला गुरुवारी (दि.१५) दुपारी साधारणत: चार वाजेपासून वाकडी बारव (चौक मंडई) येथून सुरुवात होईल़ ही मिरवणूक जहांगिर मशीद - दादासाहेब फाळके रोड - महात्मा फुले मार्केट - बादशाही लॉज कॉर्नर - विजयानंद थिएटर - गाडगेमहाराज पुतळा - गो़ ह़ देशपांडे पथ - धुमाळ पॉइंट - सांगली बँक सिग्नल - महात्मा गांधी रोड - मेहेर सिग्नल - स्वामी विवेकानंद रोड - अशोकस्तंभ - नवीन तांबट आळी - रविवार कारंजा - होळकर पूल - मालेगाव स्टॅण्ड - पंचवटी कारंजा - मालवीय चौक - परशुराम पुरिया रोड - कपालेश्वर मंदिर - भाजीबाजार - म्हसोबा पटांगणावरून विसर्जन ठिकाणी जाणार आहे़
वाहतुकीतील बदल : या कालावधीत निमाणी बसस्थानकातून पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस या पंचवटी डेपोतून सुटतील तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील, तर पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल कन्नमवार पुलावरून जातील़ रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील़
जेलरोड विभाग : नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक व सैलानीबाबा चौक ते नांदूर नाका हा मार्ग दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे़ या काळात नाशिकरोड विभागातील नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक या मार्गाने जाणारी वाहने ही नांदूर नाका औरंगाबाद रोडने तपोवनातील स्वामी जनार्दन पूलमार्गे जातील व त्याच मार्गाने येतील़ वाहतूक मार्गातील बदल पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलातील वाहने व या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी लागू राहणार नाही.
नाशिकरोड गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग : नाशिकरोडला बिटको चौकातून मिरवणूक निघणार असून, दुपारी चार ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गावरील बदलाची अंमलबजावणी केली जाणार आहे़ बिटको चौकातून सुरू झालेली मिरवणूक शिवाजी महाराज पुतळा - देवी चौक - रेल्वेस्टेशन पोलीस चौकी - सुभाषरोड - सत्कार पॉइंट - देवळालीगाव गांधी पुतळा - खोडदे किराणा दुकान ते वालदेवी नदी देवळालीगावपर्यंत जाणार आहे़