नाशिकरोडला बाप्पाचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:24 AM2019-09-03T01:24:49+5:302019-09-03T01:25:22+5:30
नाशिकरोड : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष नाशिकरोड परिसरात घराघरांत, सोसायटी, कॉलनी व सार्वजनिक मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची ...
नाशिकरोड : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष नाशिकरोड परिसरात घराघरांत, सोसायटी, कॉलनी व सार्वजनिक मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात श्री गणरायाची स्थापना करण्यात आली. नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लहान-मोठे एकूण ११० सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना केली.
गणरायांच्या आगमनामुुुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून घराघरांत व सार्वजनिक मंडलाच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. सोमवारी सकाळपासून गणपतीमूर्ती विक्रीच्या स्टालवर भाविक सहकुटुंब मूर्ती घेण्यासाठी आले होते.
काही मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणरायाचा जयजयकार करत मिरवणूक काढून श्री गणरायाची स्थापना केली.
जेलरोड येथे मनपाकडून मूर्तीविके्रत्यांना उभारून देण्यात आलेल्या स्टॉलवर मूर्ती, पूजेचे साहित्य, डेकोरेशन घेण्यास दिवसभर गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता. यामुळे वाहतूक हळूहळू सुरू होती. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री गणरायांच्या आगमनामुळे बच्चे कंपनीत मोठा आनंद दिसून येत होता.
नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळ, ईगल स्पोर्ट्स अॅण्ड सोशल क्लब, प्रेस वेल्फेअर सोसायटी, बालाजी सोशल फाउंडेशन, देवळालीगावातील संभाजीरोड मित्रमंडळ, अनुराधा फेण्ड सर्कल, म्हसोबा मित्रमंडळ, श्री गणेश एकता कला व क्र ीडामंडळ, देवळालीगाव कला, क्र ीडामंडळ आदी मंडळांनी मोठमोठे चलत देखावे साकारले आहेत. मंडळांनी केलेल्या विद्युत रोषणाईमुळे तेथील परिसर उजळून गेला आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील वीस बंदीवानांनी तयार केलेल्या एक हजार श्री गणेशमूर्तींना यंदाही भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाल्याने सर्वच मूर्तींची विक्री झाली आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात वीस बंदीबांधवांनी पर्यावरणपूरक हजाराहून अधिक गणेशमूर्ती साकारल्या होत्या. यंदा कागदाच्या लगद्यापासून व शाडूमातीने बारा फुटांची मूर्ती बनविण्यात आली होती. लॅमरोड येथील संसरी नाका मित्रमंडळाने सदर मूर्ती घेऊन स्थापना केली.
मूर्ती घेणाऱ्या भाविकांना पाट आणि वस्त्रदेखील देण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, कारखानाप्रमुख पल्लवी कदम यांनी सांगितले. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर मूर्ती विकण्याचे नवीन केंद्र उभारण्यात आले आहे. बंदीबांधवांनी बनविलेल्या जवळपास सर्वच मूर्ती विक्रीस गेल्या आहेत. सोमवारी सकाळपासून कारागृहाच्या केंद्रात मूर्ती घेण्यासाठी भाविक सहकुटुंब आल्याने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.