मंडळांच्या मंडपात ‘पीओपी’चेच बाप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:51 AM2017-08-27T00:51:08+5:302017-08-27T00:51:21+5:30
शाडूमातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासंदर्भात महापालिकेसह विविध संस्थांनी जनजागृती करूनही यंदा काही मोजक्या मंडळांचा अपवाद वगळता बव्हंशी सार्वजनिक गणेश मंडळांनी पीओपी अर्थात प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींचीच प्राणप्रतिष्ठा करत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हरताळ फासला आहे. याउलट, घराघरांमध्ये असंख्य कुटुंबीयांनी पीओपीला फाटा देत शाडूच्या मूर्तींना पसंती दिली आहे.
नाशिक : शाडूमातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासंदर्भात महापालिकेसह विविध संस्थांनी जनजागृती करूनही यंदा काही मोजक्या मंडळांचा अपवाद वगळता बव्हंशी सार्वजनिक गणेश मंडळांनी पीओपी अर्थात प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींचीच प्राणप्रतिष्ठा करत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हरताळ फासला आहे. याउलट, घराघरांमध्ये असंख्य कुटुंबीयांनी पीओपीला फाटा देत शाडूच्या मूर्तींना पसंती दिली आहे. नाशिक शहरात गोदावरीसह नासर्डी, वालदेवी, दारणा आदी नदीपात्रांमध्ये दरवर्षी लाखो गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. त्यात मोठ्या प्रमाणावर ‘पीओपी’पासून तयार केलेल्या मूर्तींचा समावेश असल्याने नदीपात्रात जलप्रदूषणाचा सामना करावा लागत असतो. पीओपीच्या मूर्तींचे पाण्यात विघटन होत नाही शिवाय, मूर्तिकामासाठी वापरण्यात येणाºया रंगांमध्येही रासायनिक घटकांचा समावेश असल्याने जलप्रदूषणात अधिक भर पडते. गेल्या काही वर्षांपासून शहरात गोदावरीसह अन्य नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गाजतो आहे. काही पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिकेद्वारे नदीप्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे. त्यातूनच महापालिकेला स्वतंत्ररीत्या गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना करणे भाग पडले आणि त्यामार्फत गोदाघाट परिसराची कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यावर भर दिला जात आहे. महापालिकेमार्फत जलप्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच नदीपात्रात निर्माल्यासह प्लॅस्टिक पिशव्या तसेच रासायनिक घटक असलेली साधने टाकू नयेत, याकरिता अनेक स्वयंसेवी-सेवाभावी संस्था जनजागृतीचे कार्य करत असतात. या जागृतीचाच एक भाग म्हणून दरवर्षी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींऐवजी शाडूमातीपासून तयार केलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा आग्रह धरला जातो.
मंडळांना भव्यतेचे आकर्षण
सार्वजनिक मंडळांना मूर्तीच्या भव्यतेचे आकर्षण असते. त्यातूनच १० ते १५ फुटांपर्यंतच्या मूर्ती बसविण्यासाठी चढाओढ लागते. मात्र भव्य, जास्त उंचीची मूर्ती ही शाडूमातीकामात उपलब्ध होत नसल्याने नाइलाजास्तव पीओपीची मूर्ती आणावी लागत असल्याचे मंडळांच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे. काही मंडळांकडून अशा जास्त उंचीच्या मूर्ती विसर्जित न करता त्यानंतरच्या वर्षी अन्य दुसºया मंडळांना अथवा दुसºया शहरात पाठविल्या जात असतात. मोठ्या मूर्तींऐवजी छोटी मूर्ती विसर्जित केली जात असल्याचेही पदाधिकाºयांकडून सांगण्यात आले.