कोरोनामुळे बाप्पांचे अपडाऊन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:16 AM2021-09-11T04:16:01+5:302021-09-11T04:16:01+5:30
मनमाड : मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमधील श्री गणरायाना यंदा दहा दिवस दररोज मनमाड ते कुर्ला असा प्रवास घडणार नाही. ...
मनमाड : मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमधील श्री गणरायाना यंदा दहा दिवस दररोज मनमाड ते कुर्ला असा प्रवास घडणार नाही. कोरोनाचे सावट आणि त्यातच रेल्वेसेवा बंद असल्याने मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमधील श्री गणरायाच्या मूर्तीची स्थापना मनमाड रेल्वे यार्डातील बोगीत माजी आमदार जगन्नाथ धात्रक व नरेंद्र खैरे यांच्या हस्ते करण्यात आली. गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळ अध्यक्ष विवेक शेजवळ यांच्यासह पदाधिकारी अतिथी म्हणून उपस्थित होते.
कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमधील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्य पूर्ण उत्सव समजला जातो. गोदावरी एक्सप्रेसच्या बोगीमध्ये आकर्षक सजावट करून श्रीची स्थापना केली जाते आणि प्रवाशाच्या साक्षीने गणरायाना मनमाड ते कुर्ला असा दररोज अडीचशे किलोमीटरचा प्रवास घडतो. या उत्सवामुळे गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण असते पण यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे.
गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाचे यंदा २५ वे वर्ष आहे. सध्या रेल्वे बंद असल्यामुळे मनमाड रेल्वे स्टेशन यार्डात एक स्वतंत्र बोगी या उत्सवासाठी उपलब्ध करून दिली आहे. या बोगीत आकर्षक सजावट करण्यात आली असून सकाळी नरेंद्र खैरे यांच्या हस्ते श्रीची स्थापना करण्यात आली. यावेळी गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळ अध्यक्ष विवेक शेजवळ, सदस्य राजू भडके, मुकेश निकले,संदीप व्यवहारे, राहुल शेजवळ, भूषण पवार,मच्छिंद्र सांगाले, सूरज चौधरी, शेखर थोरात, गोरख खैरे, उमेश देसाई, धनजय आव्हाड, चेतन मराठे, मंगेश जगताप, संदीप आढाव, स्वप्नील म्हस्के, अमन म्हसदे, संतोष मुणोत, शरद राऊत, ललित आंबेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------------
मनमाड येथे गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाच्या वतीने गणरायाची स्थापना करण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित जगन्नाथ धात्रक, नरेंद्र खैरे, विवेक शेजवळ,राजू भडके आदी. (१० मनमाड १)
100921\10nsk_4_10092021_13.jpg
१० मनमाड १