बार व्यावसायिकांनी बदलले प्रवेशद्वार

By admin | Published: May 8, 2017 01:53 AM2017-05-08T01:53:58+5:302017-05-08T01:54:10+5:30

नाशिकमधील अनेक मद्यविक्रीच्या दुकानदारांनी अचानक प्रवेशद्वाराच्या दिशा बदलून घेतल्याने त्यांना पुन्हा एकदा बरकत प्राप्त होऊ लागली आहे.

Bar entrance entrants | बार व्यावसायिकांनी बदलले प्रवेशद्वार

बार व्यावसायिकांनी बदलले प्रवेशद्वार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एरव्ही मद्याची दुकाने कोणत्याही दिशेला असली तरी ती वेगाने चालतातच, त्याला वास्तुशास्त्राचे नियम लागू होत नाही का? असा प्रश्न सुजाण नागरिक सोशल मीडियावर करीत असतात. त्यात खरोखरच तथ्यही दिसत असते. आता मात्र नाशिकमधील अनेक मद्यविक्रीच्या दुकानदारांनी अचानक प्रवेशद्वाराच्या दिशा बदलून घेतल्याने त्यांना पुन्हा एकदा बरकत प्राप्त होऊ लागली आहे. ‘दिशा’ बदलली आणि लगेचच ‘दशा’ही बदलली गेली.
मद्याच्या व्यवसायाचे अजब गणित आहे. बार असो अथवा लिकर शॉप तो कोणत्याही दिशेला म्हणजे एरव्ही दक्षिण दिशा वर्ज्य मानली जात असताना दक्षिणाभिमुख असलेली दुकानेही तितक्याच जोमाने चालतात. शिवाय कोणत्याही अर्थसंकल्पात कराचा भार किंवा अधिभार वाढवायचा ठरवला की, मद्य हे गृहीतच धरले जाते. परंतु इतका करभार सोसूनही व्यावसायिक आणि मदिराभक्त चकार शब्द काढत नाहीत वा विरोध करीत नाही. त्यांच्या या सहनशील वृत्तीची मनोरंजनात्मक चर्चा विविध पोस्टच्या रूपाने सोशल मीडियावर नेहमीच होत असते. परंतु आता मात्र जणू सर्वच मद्य व्यावसायिक जरा ‘भावनिक’ बनले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत मद्य दुकानदार आणि बारला परवानगी नाकारली आणि अनेकांच्या पोटात भीतीचा घोळा उभा राहिला. अशा भीती आणि उदरनिर्वाहावरील गंडांतरामुळेच अनेक व्यावसायिकांनी दिशा दर्शनाचा आधार घेतला आणि बघता बघता जिल्ह्यातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या प्रवेशद्वाराची दिशाच बदलली.
काहीसे आश्चर्य वाटले तरी यात दुकानदारांचे हे वास्तुशास्त्रावरील श्रद्धेपोटी उचलले पाऊल नाही तर ‘कायदेशीर’ पाऊल आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आतील सर्व बार आणि दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या बार व्यावसायिक आणि दुकानदारांच्या उदरनिर्वाहावर गंडांतर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील १११६ अनुज्ञप्तीधारकांपैकी ७६३ परवाने केवळ एका आदेशासरशी रद्द झाले आहेत. परंतु तसे होऊ नये यासाठी शासनाच्या कायदेशीर अंतर मर्यादचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी शक्कल लढविली. महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या काठावर म्हणजेच ४८० किंवा ४९० मीटर अंतरात मद्याचे दुकान येत असेल तर ते पाचशे मीटर बाहेर दाखवण्यासाठी या क्लृप्त्या लढविण्यात आल्या आहेत. मोठ्या भूखंडावर असलेल्या बारचे प्रवेशद्वार हे पाचशे मीटर अंतराच्या आत येत असेल तर ते अन्य बाजूने म्हणजे पाचशे मीटर अंतराबाहेर प्रवेशद्वार असावे यासाठी शहरासह जिल्ह्यातील अनेक बारचालकांनी अशाप्रकारचे बदल आपल्या बारच्या रचनेत करून घेतले आहेत.

Web Title: Bar entrance entrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.