बरसला वरुणराजा, फास कार्यकारी अभियंत्याला
By Admin | Published: July 21, 2016 02:16 AM2016-07-21T02:16:01+5:302016-07-21T02:16:48+5:30
अजब : महसूल-पाटबंधारे खात्यात जुंपणार
नाशिक : गेल्या आठवड्यात धो धो कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यासह पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या प्रशासनालाही दिलासा देत, पालखेड धरणात दर तासाला धोक्याची पातळी गाठण्यास सुरुवात केल्यामुळे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मासेमारी करणारे पुरात सापडले, परिणामी त्यांना रेस्क्यू करण्याची वेळ आल्याचे कारण शोधत जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्याला दोषी ठरवत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या या नोटिसीने पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
पालखेड धरणातून डाव्या कालव्याच्या माध्यमातून येवला व मनमाडसाठी पाणी सोडले जात असल्यामुळे धरणाच्या पाण्याचा फुगवटा न होण्यास मदत होत होती, तरीही पालखेड धरणाची साठवण क्षमता व पावसाचे प्रमाण पाहता पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी कादवा नदीत हळूहळू पाणी सोडण्याचा निर्णय घेतला व प्रारंभी दीड हजार व नंतर टप्प्याटप्प्याने ३१ हजार क्यूसेक इतके पाणी सोडावे लागले, परिणामी कादवा नदीला पूर आला. धरणातून ज्यावेळी पाणी सोडले त्याचवेळी पाटबंधारे खात्याने कादवा नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशाराही दिला. याचदरम्यान, कादवा नदीला पुढे अन्य नाल्यांचे पाणी येऊन मिळाल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन तीन ग्रामस्थ पाण्यात अडकले. या तिघांना काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांची मदत घेऊन दहा तासांनंतर सुखरूपपणे बाहेर काढावे लागले. तसे पाहिले तर ही सारी घटना नैसर्गिक आपत्तीत मोडली जात असताना, पाटबंधारे खात्याने पडणारा पाऊस व धरणातील साठा पाहता पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केलेली असताना, नेमक्या या साऱ्या प्रकारास पाटबंधारे खाते जबाबदार असल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाने काढला व पालखेड पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या नोटिसीमुळे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, गंगापूर धरणातून पाणी न सोडताच गोदावरीला पूर येऊन दीड डझन वाहने वाहून गेली, मग त्याला जिल्हा प्रशासन कोणाला जबाबदार धरणार, असा सवाल केला आहे.