गर्दी नियंत्रणासाठी शहरात बॅरिकेडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:36+5:302021-04-04T04:15:36+5:30
नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असताना व त्यातच बाजारपेठेत नागरिकांची वाढती गर्दी पाहून पोलीस व महापालिका प्रशासनाने ...
नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असताना व त्यातच बाजारपेठेत नागरिकांची वाढती गर्दी पाहून पोलीस व महापालिका प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या असून, शनिवारी मेनरोड बाजारपेठेसह संपूर्ण परिसरातील दुकाने बंद असल्याची संधी साधत या भागात कडक निर्बंध लावण्यासाठी रस्त्यारस्त्यांवर लाकडी बल्ली बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कृतीने अफवांचे पीक उठले असले, तरी केवळ बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी केलेली ''तजवीज'' असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहर व परिसरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस व महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी विविध उपायोजना केल्या जात आहेत. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी ५ रुपयांची पावती तात्पुरती रद्द करून टोकन पद्धती राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ही टोकन पद्धत अमलात आणताना कुठल्याही प्रकारे कसूर राहू नये म्हणून बाजारपेठेत येणाऱ्या प्रमुख रस्त्यांव्यतिरिक्त अन्य रस्ते थेट बल्ली बॅरिकेडिंग करून बंदिस्त करण्यास शनिवारी सुरुवात केली.
सरकारवाडा, भद्रकाली, नाशिकरोड हद्दीतील बिटको, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड हद्दीतील त्रिमूर्ती चौक अशा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानकपणे बाजारपेठांमध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग सुरू करण्यात आले. तसेच धुमाळ पॉईंट येथे तंबूही ठोकण्यात आला. मात्र, हा तंबू कर्मचाऱ्यांना उन्हापासून बचावासाठी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही तयारी केवळ बाजारपेठांतील गर्दी नियंत्रणासाठीच असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. बाजारपेठांत येणाऱ्या नागरिकांनी टोकन घेतल्यानंतर एका तासात खरेदी आटोपून बाहेर पडायचे आहे, जेणेकरून गर्दी उसळून ''सोशल डिस्टन्स''चा फज्जा उडणार नाही. कोणीही व्यक्ती विनाकारण रेंगाळत असल्याचे आढळून आल्यास ५०० रुपये दंडाची कारवाई तिच्याविरुद्ध केली जाणार आहे.
----इन्फो---
मेनरोड, दहीपुलावर वाहनांना बंदी
रेडक्रॉस चौकातून उजवीकडे वळण घेत मेनरोड, दहीपुलावर जाणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात
येणार आहे. ही वाहने एम जी रोडवरून मेहरसिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे पंचवटीत
जातील, असे पोलिसांनी म्हटले आहे. सिग्नलवर मुंदडा मार्केटच्या प्रारंभी त्यामुळे बॅरिकेडिंग केले आहे.
----इन्फो-----
सोमवारपासून अधिक कठोर अंमलबजावणी
सोमवारपासून अत्यंत कठोरपणे निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबरोबरच मास्क न वापरणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांकडून सुरू असलेली कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. सामाजिक अंतर न पाळणाऱ्या अस्थापनांवर दंडात्मक कारवाईसह ''सील''देखील करण्यात येणार आहे.
----
----कोट----
गर्दी नियंत्रणासाठी मेनरोड बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. ही शहराची मुख्य बाजारपेठ असून, येथे तोबा गर्दी उसळते. त्यामुळे बाजारपेठेत येणार्या मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. बाजरपेठांत बॅरिकेडिंग म्हणजे लॉकडाऊनची तयारी नाही.
- अमोल तांबे, पोलीस उपायुक्त