शैक्षणिक शुल्कासाठी महाविद्यालयाकडून अडवणूक; छत्रपती सेनेचे उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:07 AM2021-05-04T04:07:15+5:302021-05-04T04:07:15+5:30
नाशिक : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वच विद्यपीठांनी ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शैक्षणिक शुल्कासाठी ...
नाशिक : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वच विद्यपीठांनी ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शैक्षणिक शुल्कासाठी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात असून शुल्क न भरल्यास परीक्षेचा अर्ज भरण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप करीत छत्रपती सेनेने राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवून विद्यार्थांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना वारंवार टाळेबंदीला सामोरे जावे लागले आहे. अनेक पालकांचे रोजगार बुडाले आहे. त्यामुळे पालकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. या परिस्थितीत महाविद्यालये फी भरण्याचा आग्रह करीत आहेत. मात्र उत्पन्न घटल्याने फी कशी भरणार, असा सवाल पालकांसमोर निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सर्व महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाइन होण्याची निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाशी विद्यार्थ्यांसह पालक सहमत आहेत. मात्र, आता महाविद्यालयाकडून शैक्षणिक शुल्कासाठी अडवणूक सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शुल्काची अडवणूक थांबवावी. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी छत्रपती सेनेकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे.