मतदार याद्या शुद्धीकरणाचा ‘आधार’ कोसळला

By admin | Published: May 17, 2015 11:46 PM2015-05-17T23:46:36+5:302015-05-17T23:52:51+5:30

प्रचार-प्रसाराचा अभाव : मतदारा राजा अनभिज्ञ राहिल्याने केंद्रांवर शुकशुकाट; प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता चव्हाट्यावर

The 'base' of purification of voter lists declined | मतदार याद्या शुद्धीकरणाचा ‘आधार’ कोसळला

मतदार याद्या शुद्धीकरणाचा ‘आधार’ कोसळला

Next

नाशिक : निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण-प्रमाणिकरण कार्यक्रमांतर्गत शहर परिसरात आज रविवारी (दि.१७) मोहिमेचा दुसरा टप्पा पार पडला; मात्र या कार्यक्रमाबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून व्यापक प्रचार-प्रसार करण्यात न आल्यामुळे याद्या शुद्धीकरणाच्या मोहिमेचा ‘आधार’ कोसळला. दिवसभर शहरातील बहुतांश कें द्रांवर शुकशुकाट असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
मतदार याद्यांचे शुद्धीकरण व प्रमाणिकरण करण्याच्या उदात्त हेतूने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेमार्फत मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्डाच्या सत्य प्रतींसह नमुना अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेची सुरुवात एप्रिल महिन्याच्या १२ तारखेला करण्यात आली. दुसरा टप्पा आज राबविण्यात आला असून, पुढील महिन्याच्या २१ व अखेरचा टप्पा हा १२ जुलै रोजी राबविला जाणार आहे. मतदार याद्यांमधील दुबार नावे वगळणे, तसेच मतदार राजाचे नाव, पत्त्याची दुरुस्ती या मोहिमेअंतर्गत केली जाणार आहे. एकूणच मोहिमेचा चांगला फायदा निवडणूक प्रक्रिया राबविताना दिसून येणार आहे. मात्र सदर मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. या मोहिमेबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून आले. कारण या मोहिमेविषयी नाशिककरांमध्ये कुठल्याही प्रकारची जागृती केली गेली नाही. त्यामुळे मतदान केंद्राकडे आधार कार्ड व मतदार कार्डाच्या सत्य प्रती घेऊन मतदार राजा फिरकलाच नाही. बहुतांश केेंद्रांवर सकाळपासूनच शुकशुकाट होता, तर काही केंद्रांवर सकाळी तुरळक गर्दी झाली होती. दुपारी बारा वाजेनंतर उन्हाचा तडाखा चांगलाच वाढल्याने रस्तेही निर्मनुष्य झाले होते. त्यामुळे केंद्रांकडेदेखील जाणे नागरिकांनी टाळणे पसंत केले.
राष्ट्रीय मतदार याद्यांच्या अद्यावतीकरण करण्याचा भाग म्हणून मतदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेस सिडको भागात मतदारांच्या निरुत्साह जाणवला तर काही शाळांमध्ये बीएलओ (केंद्रस्तरीय अधिकारी) देखील गैरहजर असल्याचे प्रकार आढळून आले.
सदर मोहिमेच्या पहिला टप्पा रविवारी (दि. १७) सकाळी १० ते सायंकाळी ५ यादरम्यान घेण्यात आला. यावर शाळेतील शिक्षकांनी मात्र बहिष्कार टाकल्याचे चित्र बघावयास मिळाले. सिडकोतील बहुतांशी केंद्रावर उपस्थित असलेल्या १३२० यांनी मतदारांना मोबाइल करून त्यांची नावाची दुरुस्ती तसेच इतर अडचणी दुरुस्तीसाठी बोलावून घेतले. यामुळे वारे थोड्याप्रमाणात मतदारांची हजेरी दिसली.
मनपा गणेश चौक हायस्कूल
मनपा गणेश चौक शाळेत दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे ४० मतदारांनी हजेरी लावली. या शाळेत एकूण पाच बी.एल.ओ.ची नेमणूक करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात मात्र ३ ते ४ च बीएलओ उपस्थित होते. शाळेचे शिक्षक कोणीही हजर नव्हते.
मनपा विद्यानिकेतन क्रमांक
शाळेत मतदारांचा सकाळपासून निरुत्साह होता. दुपारपर्यंत फक्त आठच अर्ज दाखल झाले यात चार अर्ज हे एकाच घरातील होते. आधार कार्ड, शेषण कार्ड लिकिंग करणे, नावात बदल, जन्मतारीख चुकीची दुरुस्ती करणे आदि कामे केली जात तरी यास फारसा प्रतिसाद जाणवला नाही. याठिकाणी नेमण्यात आलेल्या पाच बीएलओपैकी फक्त दोनच बीएलओ हजर होते. तसेच शिक्षक एकही उपस्थित नव्हते.
मोरवाडी शाळा क्रमांक ४८/५३
शाळेत सकाळी काही मतदारांनी हजेरी लावली. पाच बीएलओंपैकी चारच बीएलओ उपस्थित होते. शिक्षकांनीही दांडी मारलेली होती. आधारकार्ड लिंकिंग दुबार नोटीस मतदार याद्या शुद्धीकरण करण्याचे काम सुरू होते. याठिकाणी नवीन नाव नोंदणीचे अर्ज नसल्याने नवीन नाव नोंदण्यासाठी आलेल्या मतदारांना माघारी फिरावे लागले.
बिटको हायस्कूल मोरवाडी
शाळेत दुपारपर्यंत ३० ते ४० मतदारांनी हजेरी लावली. याठिकाणी नाव नोंदणी, नाव दुरुस्ती, पत्ता बदल, दुबार नावे दुरुस्ती आदि सर्व अर्ज उपलब्ध असताना मतदारांनी मात्र निरुत्साह दाखविला. याठिकाणी सात बीएलओंची नेमणूक केली असताना याठिकाणी पाच बीएलओ उपस्थित होते.
दूरध्वनी करून मतदारांना बोलविले
सकाळपासूनच बीएलओ शाळांमध्ये उपस्थित असतानाही मतदारराजा मात्र हजेरी लावत नसल्याने सिडकोतील बहुतांशी सर्वच शाळांमध्ये बीएलओ ज्या मतदाराची अडचण आहे. त्यांना दूरध्वनी करून बोलावून घेतले. यामुळे तरी काही प्रमाणात मतदारांनी हजेरी लावली, तर कधी बीएलओ यांनी आपल्या केंद्राच्या परिसरात पायी फिरून मतदारांना आवाहन केले, तर काहिंनी अर्ज वाटप केले.
बदली सुट्टी द्यावी
मतदार नाव नोंदणीच्या कामासाठी नेमणूक केल्याने हे काम करणे आपले कर्तव्य आहे. असे समजून उपस्थित बीएलओ यांनी काम केले, परंतु या कामाची बदली सुट्टी मिळावी, अशी अपेक्षा बीएलओ यांनी बोलावून दाखवली. तर सुट्टीच्या दिवशी लग्न, समारंभ सोडून बीएलओची ड्युटी करावी लागत असल्याने याचा मोबदला वेळेवर मिळण्याची अपेक्षाही यावेळी सिडकोतील शाळांमध्ये उपस्थित असलेल्या बीएलओ यांनी व्यक्त केली.
इंदिरानगरला बीएलओ बसून
जनजागृतीअभावी परिसरातील मतदान केंद्रावर आधारकार्ड जोडणीसाठी प्रतिसादाअभावी बीएलओे बसून होते. तर सुखदेव प्राथमिक व माध्यमिक शाळेत एकच बीएलओ उपस्थित, तर बाकी सात गैरहजर होते.
निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान कार्डाला आधारकार्डच्या क्रमांक जोडणीचा आज विषेश कार्यक्रम मतदान केंद्रावर राबविण्यात आला; परंतु जनजागृतीअभावी प्रतिसाद नव्हता. त्यामुळे बहुतेक मतदान केंद्रावर बीएलओ बसून होते. सुखदेव प्राथमिक व माध्यमिक शाळेत महेश पगारे (स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा) हेच हजर होते, तर इतर सात जण गैरहजर होते. तर स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेत बीएलओ होते. मात्र, केवळ तीन मतदारांनी हजेरी लावली होती. डे केअर शाळेत आठपैकी तिघेजण उपस्थित होते. आणि पाचजण गैरहजर होते. तसेच जाजू विद्यालयात बीएलओ होते, तर मतदारांनी पाठ फिरविली होती. सायंकाळपर्यंत बहुतेक मतदान केंद्रावर २० ते ३० मतदारांनीच हजेरी लावली होती.
राष्ट्रीय मतदार यादी शुद्धिकरण
प्रमाणीकरण कार्यक्र माअंतर्गत आधार जोडा मोहिमेला सातपूर परिसरात अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. आज परिसरातील सर्व मतदान केंद्रांवर ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेकडे मतदारांनी सपशेल पाठ फिरवली. आजच्या मोहिमेत फारसे नविन मतदार नाव नोंदणीसाठी आले नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: The 'base' of purification of voter lists declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.