धोंडेगावला विहिरींनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:24 AM2019-05-28T00:24:51+5:302019-05-28T00:25:08+5:30
नाशिक तालुक्यातील धोंडेगाव गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. गावातील विहिरीचे पाणी आटल्याने दोन-तीन दिवसांतून एकदा पाणी येते.
गंगापूर : नाशिक तालुक्यातील धोंडेगाव गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. गावातील विहिरीचे पाणी आटल्याने दोन-तीन दिवसांतून एकदा पाणी येते. पाणीपुरवठ्यासाठी गावात दोन विहिरी आहेत. मात्र त्या आटल्याने पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी शेताच्या विहिरींमधून अथवा कश्यपी धरणाला लागून असलेल्या नदीच्या कडेच्या विहिरीतून पाणी आणण्याची वेळ आली आहे.
गावात असलेल्या विहिरी व कूपनलिकेचे पाणी आटले असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्या विहिरी किंवा कूपनलिकेला पाणी आहे, ते शेतकरी समाधानी आहेत. मात्र नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील विहिरी तळ गाठण्यास सुरु वात झाल्याने पुढील परिस्थिती भयानक होऊ शकते. पर्यायी व्यवस्था म्हणून विहिरींना खाली खोल करून अथवा आडवी बोर मारून गावातील पाण्याची समस्या सोडविणे याचे प्रयत्न सर्व स्थरातून केले जात असल्याचे चित्र दिसते. पाणीपुरवठा करणाऱ्या योजना निकामी होत चालल्याने ग्रामीण भागातील नागरिक, महिला हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करतांना दिसत आहेत. दुचाकी, सायकल, हातगाडी जीपगाडी जे साधन मिळेल त्याच्या साहाय्याने दूरवरून पाणी वाहून आणले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मिळेल तिथे काम करण्यासाठी जावे लागते. शेतात काम करणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे, कारखान्यात काम करणे, चहाच्या गाडीवर काम करणे, हॉटेलात काम करणे, मिळेल त्याठिकाणी काम करणे अशी कामे करावी लागत असल्याने गावात ज्यादिवशी पाणी येते त्यादिवसाचे काम सोडून गावाकडे यावे लागते व पुरुष अथवा महिलेला आपल्या मजुरीवर पाणी सोडावे लागते. ग्रामीण भागातील पाण्याची पातळी खोल खोल जात असल्याने कूपनलिका, विहिरी खोदूनदेखील पाणी लागत नाही. अनेक नागरिकांनी कंटाळून याला पर्यायी व्यवस्था करण्याचा मार्ग अवलंबलेला आहे.
पाण्यासाठी : नागरिकांचे हाल
धोंडेगाव ही ग्रुप ग्रामपंचायत असून, यामध्ये कश्यपनगर, खाद्याची वाडी अशी गावे जोडलेली आहेत. येथे वस्तीवर व गावात आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत ही सर्व कुटुंबे मोलमजुरीवर उदरनिर्वाह करतात, उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतात. दोन विहिरींवर गावचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. यावर महिलांना स्वयंपाक, आंघोळ, धुणे-भांडी, पिण्यासाठी, जनावरांसाठी व्यवस्था करावी लागते. रखरखत्या उन्हामुळे पाण्याची पातळी खोल जात असल्याने विहिरींतील पाण्याची पातळी कधीही संपू शकते. समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्वदूर पाण्याची वणवण करण्याची वेळ आली आहे. यामुळे परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.