नांदूरशिंगोटे परिसरातील विहिरींनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 04:57 PM2019-03-31T16:57:13+5:302019-03-31T16:57:46+5:30
नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात होळीनंतर उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तर काही विहिरींनी तळ गाठल्याचे चित्र दिसत आहे. सद्यस्थितीत अनेक विहिरींना तळ गाठल्याने वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच परिसरातील ६० ते ७० फुट खोल असलेल्या विहिरींचा पाझर पूर्णत: आटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने पशुपालक हताश झाले आहेत. एप्रिल व मे महिन्यांत उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने आगामी दोन महिने पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मार्च महिन्यातच विहिरी पूर्णत: आटल्या आहेत. त्यामुळे शिवारातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी पशुधन असलेल्या शेतकऱ्यांसमोर पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहे. वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.