दशक्रियेच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन ‘बेसिक लाईफ सपोर्ट जनजागृती’ कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:22 PM2018-04-17T15:22:18+5:302018-04-17T15:22:53+5:30
आपल्या कुटुंबातील जवळची व्यक्ती सोडून गेल्यानंतर भावना बाजूला ठेवून जेंव्हा माणूस वास्तवाचा विचार करतो
आडगाव : ‘जो जन्मला त्याचा मृत्यू अटळ आहे’ हा विचार तत्वज्ञानाच्या दृष्टीने शंभर टक्के बरोबर असला तरी आपल्या कुटुंबातील जवळची व्यक्ती सोडून गेल्यानंतर भावना बाजूला ठेवून जेंव्हा माणूस वास्तवाचा विचार करतो तेंव्हा त्याच्यातील सामाजिक संवेदनशिलतेचे जगाला दर्शन होते. याचा प्रत्यय नुकताच मोहाडीकरांना आला. नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या मोहाडी गावातील सदगृहस्थ बाळासाहेब देवराम कळमकर यांना ह्दयविकाराच्या तीव्र झटका आला. गावापासून शहर तसे जरा दूरच. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये घेऊन जातांना त्यांची प्राणज्योत मावळली. पण वेळीच काही करता आले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचवता आले असते असा विचार कळमकर कुटुंबियांच्या मनात आला. या चर्चेदरम्यान गावातील कोणीतरी ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयी माहिती दिली. त्यांनी ही क्रि या कशी करतात हे समजावून घेण्याचे ठरवले आणि दशक्रि या विधीच्या दिवशी धार्मिक कार्यक्र म ठेवण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयी मार्गदर्शनपर कार्यक्र म मंगळवारी (दि.१७) मोहाडी गावात आयोजीत करण्यात आला. श्याम कळमकर आणि मनीषा तांबट यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. यासाठी त्यांनी नाशिक भुलतज्ञ संघटनेच्या सदस्यांना यासाठी आमंत्रित केले गेले. दशक्रि या विधीच्या वेळी ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चे प्रबोधन करण्याची ही पहिलीच घटना असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मोहाडी वासीयांनी हा दुरदर्शी विचार समोर ठेऊन हा कार्यक्र म आयोजित केला होता. यावेळी डॉ. प्रशांत देवरे, डॉ. राहूल भामरे ,डॉ. नितीन वांघचौरे आणि डॉ.दिनेश पाटील यांच्या टीमने शास्त्रशुद्ध पद्धतीने सोप्या भाषेत ‘छातीवर दाब देणे’, ‘१०८ नंबर डाईल करून म्बुलन्सला फोन करणे’ आणि मदत मिळेपर्यंत ही क्रि या चालू ठेवणे याविषयी सविस्तर माहिती दिली. कारण हृदय बंद पडल्यानंतर ५ मिनिटाच्या आत म्हणजेच मेंदूला रक्तपुरवठा थांबण्याच्या आत जर हि क्रि या दिली तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो आणि हे कुटुंबातील व्यक्तींना माहिती असणे देखील तितकेच गरजेचे आहे याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे गावातील महिलांनी स्वत: पुढाकार घेऊन ही क्रि या करून बघितली आणि वेगवेगळे प्रश्न विचारत त्यांच्या शंकाचे निरसन करून घेतले. बेसिक लाईफ सपोर्ट क्रि या जनमानसात आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवने गरजेचे आहे असल्याचे मत यावेळी तज्ञांनी उपस्थितांना सांगितले.