घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
By admin | Published: February 12, 2017 12:12 AM2017-02-12T00:12:25+5:302017-02-12T00:12:33+5:30
घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
नाशिक : जिल्ह्यातील येवला व मनमाड परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पथकाला यश आले आहे. बुधवारी येवला कोपरगाव रस्त्यावर या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले.
मनमाड परिसरातील दिलीप त्रंबक चव्हाण यांचे राहत्या घरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे पाठीमागील दरवाजाची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून ४ मोबाईल व रोख २.५ लाख रुपये असा मुद्देमाल चोरून नेला. सदर घटनेबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा आढावा घेवून केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले व त्यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला. येवला कोपरगाव रोडवर गुन्हेगारांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना गुप्त माहितीेच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरूण पगारे, रवी शिलावट, रवींद्र वानखेडे, दीपक आहिरे, अशोक पाटील आदिंच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर भागात रात्रभर सापळा रचून गुन्हेगार शंकर शिवाजी पवार (रा. मुर्शतपूर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) यास ताब्यात घेतले.
संशयित आरोपी शंकर पवार सराईत गुन्हेगार असून त्यास विश्वासात घेवून चौकशीकेली असता त्याने मनमाड आय. यु. डी. पी. परिसरात त्याचा साथीदार शिवा खुरसणे (रा. तांदुळवाडी फाटा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याचेसह घरफोडी केल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)