Bio Diversity day : नाशिकच्या गोदाकाठालगत निलगीरी वृक्षांवर वटवाघळांचा अधिवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:28 PM2018-05-22T12:28:42+5:302018-05-22T14:53:53+5:30
या प्राण्याला पंख असूनही तो पक्ष्यांच्या वर्गात समाविष्ट होत नाही तर तो सस्तन अर्थात पिल्लांना दूध पाजणारा प्राणी या गटात समाविष्ट होतो हे विशेष. वटवाघळांचा रंग बहुतांश काळा व राखाडी स्वरुपाचा असतो. दिवसा आराम आणि रात्रीची भटकंती करणारा हा निशाचर प्राणी आहे.
नाशिक : शहरामधील गोदाकाठालगत वाढलेल्या निलगीरीच्या वृक्षराजीवर लांब अंतरापर्यंत भरारी घेणारा नैसर्गिक जैवविविधतेमधील एकमेव सस्तन प्राणी वटवाघळांची वस्ती चांगलीच वाढत आहे. मात्र त्यांच्या हा अधिवास पुढे किती दिवस अस्तित्वात असेल याबाबत शंकाच आहे; कारण या वृक्षराजीचे बुंधे जमिनीपासून जाळण्याचा प्रयत्नही काही दिवसांपुर्वी करण्यात आला. याकडे अद्याप प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. हा गोदापार्कचा परिसर निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावत आला आहे. दररोज संध्यााकळी या ठिकाणी फोटोसेशन करण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. सुर्यास्तावेळी गोदापात्रात पडणारे सुर्यकिरणे आणि चमचम करणारे संथ पाणी असे विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार या भागात येतात. तसेच हिरव्या वृक्षराजीच्या परिसरात दिवसभर छायाचित्रकार, पक्षी निरिक्षकांची वर्दळ सुरूच असते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपला जावा आणि जैवविविधतेचे संवर्धन व्हावे, अशीच माफक अपेक्षा निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
वटवाघळांच्या पंखांचा विस्तार हा १९ ते २५ सें.मी. प्रतिध्वनी ऐकून वटवाघळे हे भक्ष्याचा शोध घेत आपली भूक भागवित असतात. वटवाघळे दिवसा उंच झाडांवर उलटे लटकलेले दिसतात. चीन, पोलंड, इंग्लंड, अमेरिका वटवाघळांना शुभ मानले जाते. इंग्लंडमध्ये वटवाघळांची विशेष काळजी घेतली जाते. वटवाघळांच्या आधिवासाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे धोका पोहचविण्याचा प्रयत्न केल्यास मोठी दंडात्मक कारवाई तेथील प्रशासनाकडून केली जाते. अमेरिकेमधील आॅस्टिनमध्ये लाखोंच्या संख्येने असलेल्या वटवाघळांचे अभयारण्य असून येथे वटवाघळांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन करण्यात येत आहे.
या प्राण्याला पंख असूनही तो पक्ष्यांच्या वर्गात समाविष्ट होत नाही तर तो सस्तन अर्थात पिल्लांना दूध पाजणारा प्राणी या गटात समाविष्ट होतो हे विशेष. वटवाघळांचा रंग बहुतांश काळा व राखाडी स्वरुपाचा असतो. दिवसा आराम आणि रात्रीची भटकंती करणारा हा निशाचर प्राणी आहे. वटवाघळांच्या बाबतीत एक मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे त्यांना दिवसा दिसत नाही; मात्र असे अजिबात नाही. काही प्रमाणात दृष्टी कमकुवत जरी असली तरी ते संपुर्णत: अंध नसतात.
सुपरसॉनिक ध्वनी लहरी निर्माण करण्याची क्षमता वटवाघळांमध्ये असते या लहरी माणसांचे कान ऐकू शकत नाही. या ध्वनीलहरींचा प्रतिध्वनी वटवाघळे सहज ऐकू शकतात. या लहरींवरुनच ते आपली पुढील वाट चालत असतात. ध्वनी अडल्या अर्थात याममध्ये अडथळा जाणवला की वटवाघळे तेथून माघारी फिरतात. त्या वाटेने पुढे जात नाही. भारतात वटवाघळांच्या सुमारे दहा ते बारा जाती विविध भागांमध्ये आढळतात. जुलै ते आॅक्टोबर या काळात म्हणजेच पावसाळ्यात या प्राण्याचा विणीचा हंगाम असतो.