आमदारत्रयीत श्रेयवादाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 07:08 PM2018-10-06T19:08:31+5:302018-10-06T19:09:05+5:30
येवला विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी निधी मंजुरीवरून आता आमदार छगन भुजबळ, आमदार नरेंद्र दराडे आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, तीनही आमदारांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यामुळेच प्रयत्नांना यश येऊन तालुक्याला भरघोस निधी मिळाल्याची पत्रके प्रसिद्धीस देत दावेदारी ठोकली आहे.
येवला : येवला विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी निधी मंजुरीवरून आता आमदार छगन भुजबळ, आमदार नरेंद्र दराडे आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, तीनही आमदारांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यामुळेच प्रयत्नांना यश येऊन तालुक्याला भरघोस निधी मिळाल्याची पत्रके प्रसिद्धीस देत दावेदारी ठोकली आहे.
येवला विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी ६९ लाख रुपयांची ९ कामे मंजूर झाली असल्याची माहिती एका पत्रकान्वये भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाने दिली आहे. ग्रामीण भागातील अल्पसंख्याकबहुल क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे ही कामे झाल्याचा दावा यात करण्यात आला आहे, तर नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीपैकी त्यातील ४९ लाख रु पयांचा निधी येवला तालुक्यासाठी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे या दोघा आमदार बंधूंच्या वतीने कुणाल दराडे यांनी प्रसिद्धिस दिली आहे. आमदार दराडे बंधूंच्या प्रभावामुळेच येवल्याला सर्वाधिक निधी मिळाल्याचा दावाही कुणाल दराडे यांनी केला आहे. त्यात राजापूर गटात सर्वाधिक कामे मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.
शासनाने राज्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रातील मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी सन २०१८-१९ मध्ये ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्र मास मंजुरी दिली आहे. या निधी मंजुरीवरून आता भुजबळ आणि दराडे बंधू समर्थकांकडून दावेदारी केली जात असून, श्रेयवादाची लढाई यापुढे आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
विविध कामांचा समावेश
सदर कामांमध्ये निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील मुस्लीम वस्तीत रस्त्याचे काँक्रि टीकरण करणे (२० लाख) तसेच येवला तालुक्यातील पाटोदा येथे शादीखाना बांधणे (७ लाख), न्याहारखेडा येथे शादीखाना बांधणे (७ लाख), न्यारखेडा येथे कब्रस्तानास संरक्षक भिंत बांधणे (५ लाख), अनकाई येथील जैन धर्मस्थानक परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे (३ लाख), तळवाडे येथे शादीखाना बांधणे (७ लाख), कौटखेडा येथे शादीखाना बांधणे (७ लाख), राजापूर येथील कब्रस्तानाला संरक्षक भिंत बांधणे (१० लाख) आणि नगरसूल मशीदजवळ पेव्हर ब्लॉक बसवणे (३ लाख) या कामाचा समावेश आहे.