नाशकातील शिवसेनेत हाणामारी

By admin | Published: February 4, 2017 02:09 AM2017-02-04T02:09:01+5:302017-02-04T02:09:21+5:30

बोरस्ते-पांडे समर्थक भिडले; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

The battle of Shiv Sena in Nashik | नाशकातील शिवसेनेत हाणामारी

नाशकातील शिवसेनेत हाणामारी

Next

 नाशिक : शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांच्या पुत्रास सेनेने उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून चांडक सर्कलवरील एका हॉटेलमध्ये पांडे आणि महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या समर्थकात राडा झाला. यावेळी महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून सौम्य लाठीमार केल्यानंतर तणाव निवळला़ दरम्यान, तिकीटवाटपात अर्थकारणाचा आरोप करणारे पांडे हे पुत्रप्रेमापोटी खोटे बोलत असल्याचे तसेच आपल्याला मारहाण झाली नसल्याचे महानगरप्रमुख बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़
नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता़ सेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांचे पुत्र ऋतुराज पांडे यांनी प्रभाग २४ मधून उमेदवारी मागितली होती़ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी टाळण्यासाठी अखेरपर्यंत उमेदवारी याद्या घोषित न करता अखेरच्या टप्प्यात एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली़ यामध्ये ऋतुराज पांडे यांना उमेदवारी नाकारल्याचे समजताच ते संतापातच आपल्या कार्यकर्त्यांसह एबी फॉर्मचे वाटप सुरू असलेल्या चांडक सर्कलजवळील एका हॉटेलमध्ये पोहोचले़
हॉटेलमधून आमदार अनिल कदम, विजय करंजकर, शिवाजी सहाणे, अजय बोरस्ते यांच्याकडून एबी फॉर्मचे वाटप सुरू होते़ या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी डावलण्याचा जाब विचारल्याने त्यांच्यामध्ये बाचाबाची होऊन ती गच्ची धरण्यापर्यंत मजल गेली व हाणामारीस सुरुवात झाली़ यावेळी महानगरप्रमुख अजय बोरस्ते जिन्याने खाली जात असतानाच पांडे व त्यांच्या समर्थकांनी गाठत मारहाण केली असे सांगण्यात आले. या गोंधळाची माहिती मिळताच बोरस्ते व पांडे समर्थक आपसात भिडले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्तडॉ़राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ़ सीताराम कोल्हे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करून आठ ते नऊ संशयितांना ताब्यात घेतले़ यावेळी घटनास्थळी पोहोचलेले माजी महापौर विनायक पांडे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर अर्थकारण करून उमेदवारी दिल्याचा आरोप केला़ तर पांडे यांनीही बोरस्ते यांच्यावर आरोप केले. हा वाद मिटल्यानंतर ऋतुराज पांडे व कल्पना पांडे यांनी भाजपाच्या संपर्कात गेले दोघांनाही भाजपाने उमेदवारी दिली. मात्र नंतर त्यांनी भाजपाचे एबी फॉर्म घेण्यास न दिल्याचे माध्यमांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The battle of Shiv Sena in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.