‘सर्वोत्तम व्हा, समाज तुम्हाला स्विकारणारच’ : हणमंतराव गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 07:25 PM2018-10-17T19:25:54+5:302018-10-17T19:29:02+5:30
आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तमच करायचे अशी खुनगाठ मनाशी बांधून पुढील वाटचाल करावी, असा मौलिक सल्ला भारत विकास समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.
नाशिक : स्पर्धेच्या युगात चांगले, उत्तम होऊन चालणार नाही, तर आपण सर्वोत्तम होऊन यशोशिखर सर करण्याचा प्रयत्न करायला हवा. सर्वोत्तम होऊन तुम्ही जेव्हा पुढे याल तेव्हा समाज तुमची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तमच करायचे अशी खुनगाठ मनाशी बांधून पुढील वाटचाल करावी, असा मौलिक सल्ला भारत विकास समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.
काठेगल्ली येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्रजी माध्यमाच्या रंगुबाई जुन्नरे विद्यालयाला गायकवाड यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केले. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप फडके, मुख्याध्यापक नंदा पेठेकर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने फडके यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. यावेळी गायकवाड म्हणाले, आपण कोणत्या कुटुंबात जन्माला आलो किंवा आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी आहे? यावर आपले यश अजिबात अवलंबून नसते. आयुष्याचे दुसरे नाव संघर्ष आहे, हे आपण लक्षात घेत आपल्या मनाची तयारी करत आपल्यासमोर येणाऱ्या नवनवीन आव्हानांचा सामना करायला शिकले पाहिजे. कारण संघर्ष कधी संपत नसतो आणि आव्हानेदेखील तशीच असतात फरक केवळ आव्हानांच्या स्वरुपामध्ये पडतो, असे गायकवाड यावेळी म्हणाले.
भारत जगातील सर्वाधिक तरुण देश आहे. या देशातील तरुणांना जगभरात नोकरीच्या संधी आहेत. गरज आहे ती केवळ उच्चशिक्षणासोबत कौशल्य आत्मसात करण्याची. आयुष्यात स्वत:ची प्रगती साधण्यासाठी कधीही कोणासोबत स्पर्धा किंवा तुलना करु नका. वर्गातदेखील ज्याने प्रथम क्रमांक मिळविला त्या मित्राशी आपली तुलना करायची नाही. आपण कुठे कमी पडलो त्याचा विचार करत जिद्द व क ठोर परिश्रम करावे, असा सल्ला गायकवाड यांनी दिला. प्रास्ताविक फडके यांनी केले. सुत्रसंचालन जयश्री चौधरी यांनी केले.
जपानी भाषेचे धडे देण्याचा सल्ला
भविष्यात भारतातील तरुणाईला जपान, जर्मनीसारख्या देशांमध्ये उज्ज्वल भवितव्याची संधी आहेत. गरज आहे ती केवळ जपानी भाषा शिकण्याची. जपानी भाषा ज्याला जमली त्याला जपानमध्ये कुठल्याहीप्रकारचा अडथळा येत नाही. त्यामुळे जपानी भाषेचे वर्ग सुरू करण्याचा सल्लाही गायकवाड यांनी यावेळी संस्थेच्या विश्वस्तांना दिला.