महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजीगणेशोत्सवात सुरक्षिततेसाठी सतर्क ता बाळगा
By admin | Published: September 1, 2016 12:53 AM2016-09-01T00:53:28+5:302016-09-01T01:16:24+5:30
नियोजन बैठक : महापौरांचे गणपती मंडळांना आवाहन;
नाशिक : महानगरपालिका या गणेशोत्सवात मंडळांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविणार असून, गणपती उत्सव मंडळांनी शांततापूर्ण मार्गाने आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले.
अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने बोलावलेल्या शहरातील विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, नगरसेवक संजय चव्हाण, राहुल दिवे, वत्सला खैरे, कविता कर्डक, तानाजी जायभावे, हरिभाऊ फडोळ, राजेंद्र महाले, प्रकाश लोंढे, पोलीस निरीक्षक नम्रता देसाई आदि उपस्थित होते. महापौर म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम मंडळांनी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दर्शनरांग व मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅ मेरे बसवून गर्दीवर नियंत्रण ठेवावे. पोलीस यंत्रणेवरील सुरक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळांनी पोलीसमित्र म्हणून भूमिका पार पाडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी गणेशोत्सव मंडळांनी उत्सव काळात शहरातील पथदीप लवकर सुरू करून उशिरा बंद करण्याची मागणी केली. तसेच निर्माल्य व्यवस्थापन, अखंडित वीजपुरवठा, मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवावे, लोंबकळत्या विद्युत तारा भूमिगत कराव्या, अतिक्रमण हटवावे तसेच पाणीकपात रद्द करून शहरात स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करावा आदि मागण्या गणपती मंडळांनी महापौरांसमोर मांडल्या. त्यावर महापालिकेकडून मंडळांच्या सर्व मागण्या गांभीर्याने घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महापौर मुर्तडक यांनी दिले. बैठकीसाठी विविध गणपती मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)